महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक

सायबर पोलिसांमुळे साडेपाच लाख मिळाले परत

Jul 12, 2025 - 19:32
Jul 12, 2025 - 19:32
 0  32
महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक

सोलापूर : अनोळखी कॉल उचलला व गुंतवलेल्या रकमेवर लगेचच १५ ते २० टक्के परतावा मिळेल, असे आमिष समोरील व्यक्तीने दाखविले. त्यावर सोलापुरातील महिला डॉक्टरने विश्वास ठेवला व लगेचच सायबर गुन्हेगारांनी त्यांना बनावट ग्रुपमध्ये घेतले. त्या ठिकाणी विविध व्यक्तींचे अनुभव पाहून महिला डॉक्टरने सुरवातीला २० हजार रुपये गुंतवले. त्यानंतर थोडे थोडे करून तब्बल १७ लाख गुंतवले, पण त्यांना एक रुपयाही जादा मिळाला नाही. डॉक्टरने सायबर पोलिसांत धाव घेतली.

सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिला डॉक्टरने सुरवातीला २० हजार रुपये गुंतवले व त्यानंतर जादा परतावा मिळतोय म्हणून स्वतःकडील व नातेवाइकांकडून उसने पैसेही गुंतवले. काही दिवसांत १७ लाख गुंतवले व त्यातून त्यांना २५ लाखांहून अधिक रुपये मिळणार असा विश्वास होता. त्यांनी ती रक्कम काढण्याचा पर्याय निवडला, पण त्यासाठी त्यांना सायबर गुन्हेगारांनी आयकर म्हणून आणखी पैसे भरावे लागतील, असे सांगितले. त्यावर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली व त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व सायबर गुन्हेगारांनी एका खात्यात ठेवलेले साडेपाच लाख रुपये फ्रिज केले. न्यायालयाच्या आदेशावरून ती रक्कम संबंधितांना परत केली.

संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील
सोलापुरातील महिला डॉक्टरची फसवणूक करणारे संशयित आरोपी राजस्थान व दिल्लीतील असल्याची बाब सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. एका बँक खात्यातून सुमारे आठ ते दहा बँक खात्यात महिला डॉक्टरची रक्कम पाठविण्यात आली असून आम्ही त्याचा शोध घेत असल्याची माहिती सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow