अबब.. स्वीकृतसाठी पाऊस; 300 पेक्षा अधिक़ इच्छुकांचे अर्ज

किती निष्ठावंतांना संधी?की आयारामना पुन्हा रेडकार्पेट,भाजपा 9,एमआयएम एक़ कोटा?बी प्लॅनची अधिक चर्चा

Feb 6, 2026 - 00:04
 0  393
अबब.. स्वीकृतसाठी पाऊस; 300 पेक्षा अधिक़ इच्छुकांचे अर्ज

(विजयकुमार पिसे)
  आज महापौर आणि उपमहापौरपदाची निवड बिनविरोध होणे अपेक्षित आहे. पुढील काळात कामकाज कसे पार पडणार, याचाही अंदाज आज येईलच. तूूर्तास या निवडणुकीपेक्षा स्वीकृत सदस्य कोण होणार याची अधिक़ चर्चा आणि उत्सुकता शहरवासियांना आहे. सत्ताधारी भाजपाच्या कोट्यात 9 जागा अपेक्षित आहेत, यासाठी  तब्बल 300 पेक्षा अधिक़ अर्ज इच्छुकांकडून आले असावेत. 87 जागा जिंकणार्‍या भाजपात *आयाराम किती याची मोजदाद करण्याची आवश्यकता राहिली नाही, पण हाच पॅटर्न स्वीकृतसाठी राहिला तर सोलापूरकरांनाही आश्‍चर्य वाटणार नाही. त्यामुळे किती निष्ठावंत आणि सोशल इंजिनिअरिंग कसे असेल, याकडे मात्र सोलापूरकरांचे लक्ष राहील  
    विनायक कोंड्याल आणि ज्ञानेश्‍वरी देवकर हे अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर म्हणून बहुमताने निवडून येणार यात कसलीच शंका नाही. निवडणुकीपूर्वीच कोंड्याल यांचे नाव जाहीर झाल्यासारखेच होते. ते तडीस नेले. देवकरांना मात्र सरप्राईज गिफ्ट मिळाले. अशा प्रकारे सरप्राईज स्थायी समिती सदस्य,सभापती आणि स्वीकृत सदस्य निवडीबाबत  असू शकेल. 
    भाजपाकडे अनेक इच्छुकांनी मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले, पक्षादेशानुसार माघार घेत त्यांनी अधिकृत उमेदवारांचा प्रचार केला, आणि 87 पर्यंत मजल मारली. या इच्छुकांपैकी अनेकजणांना शब्द दिला, काही जणांनी हक्काने शब्द घेतला. अशा दिल्या,घेतल्याची गोष्ट निवडणुकीच्या प्रचाराबरोबर  वाहून गेली असेल. तरीही असे इच्छुक पक्षाच्या नेत्यांची आवर्जून भेट आहेत. ज्ञाती घटक, समाज,संस्था व्यापारी, उद्योजकांचे शिष्टमंडळ रोजच भेटत आहेत. निवेदने  आणि अर्ज देखील देत आहेत. अशा इच्छुकांच्या अर्जांची संख्या (300 पेक्षा अधिक़) जणू पाऊसच पडला असेल. अंतिम निर्णय पक्ष घेईल. पण ज्यांना संधी मिळेल, ते पक्षहितासाठीच असेल. हे आवर्जून सांगितले जाईल.
   सोशल इंजिनिरिंगची अलीकडे मोठी चर्चा घडवली जात आहे. पण प्रत्यक्षात निवडून आलेले 87 सदस्य पाहता, त्यात सोशल इंजिनिरिंग किती?मधूनच एक गूड न्यूज चालवली गेली. पराभूत उमेदवारांना स्वीकृत म्हणून संधी मिळणार नाही. पण स्वीकृतमध्ये असे काही अपवाद असू शकतात. याशिवाय काही पराभूत जे अन्य पक्षाकडून लढले, पराभूत झाले. असे इच्छुक  ..अण्णा,...दादा,..भाऊ,..ताई  पक्ष नेत्यांच्या संपर्कात आहेत. काही माध्यमकर्मी व पदाधिक़ार्‍यांचे *कारभारीदेखील.  म्हणजे सर्वसमावेशक आणि सर्वांना न्याय देणारी स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया राहील, असा विश्‍वास आहे. निष्ठावंत आस लावून आहेत. शेवटी प्रश्‍न एक़च राहतो, या सर्व स्वीकृतांमध्ये परिवाराची *विचारधारा मानणारे (*कुटुंब नव्हे) किती? जो प्रश्‍न भाजपाच्या 102 उमेदवारांना तिकीट वाटपानंतर सोलापूरकरांमधूनच उपस्थित केला जात होता.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow