सोलापूरकरांसाठी मोठी बातमी! मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनमुळे पुणे अवघ्या 45 मिनिटांवर
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग निश्चित; सोलापूर-पुणे प्रवास 45 मिनिटांत, महाराष्ट्रात 9 स्टेशन, मुंबई-पुणे-सोलापूरमार्गे हैदराबादला जोडणाऱ्या 671 किमी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार झाला आहे. ताशी 300 किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमुळे मुंबई ते हैदराबाद प्रवास 3 तासांपेक्षा कमी वेळेत शक्य होणार आहे.
सोलापूर : मुंबई ते हैदराबाद दरम्यान प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, या 671 किलोमीटर लांबीच्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. मुंबई-पुणे-सोलापूरमार्गे हैदराबादला जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भविष्यात मुंबई ते हैदराबाद प्रवासाचा वेळ सुमारे 3 तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई ते हैदराबाद रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुमारे 15 तास, तर रस्ते मार्गाने 12 तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. मात्र बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 2 तास 55 मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे.
महाराष्ट्रात 9 स्थानकांवर थांबा
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक 457 किलोमीटरचा मार्ग मिळणार आहे. या मार्गावर राज्यातील 9 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रस्तावित स्थानके : विक्रोळी, ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पिंपरी-चिंचवड, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सोलापूर ते पुणे अंतर अवघ्या 45 ते 55 मिनिटांत पार करता येणार आहे.
ताशी 300 किमी वेगाने धावणार बुलेट ट्रेन
मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे ताशी सुमारे 300 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता ठेवणार आहे. सध्याच्या रेल्वेच्या तुलनेत हा वेग जवळपास पाचपट अधिक असेल. या ट्रेनमध्ये 16 डबे असण्याची शक्यता असून, एका फेरीत सुमारे 1,215 प्रवाशांची आसन क्षमता असेल. सुरुवातीच्या टप्प्यात दररोज 63 हजारांहून अधिक प्रवासी या सेवेला प्रतिसाद देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घाट विभागात 24 किमीचे बोगदे
या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक अभियांत्रिकी काम महाराष्ट्रातील खंडाळा घाट परिसरात होणार आहे. येथे 13 ठिकाणी मिळून सुमारे 24 किलोमीटर लांबीचे बोगदे प्रस्तावित आहेत. याशिवाय महाराष्ट्रात तीन ठिकाणी मिळून 35.30 किलोमीटर लांबीचा भूमिगत मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे.
विमानतळासारखी असतील स्थानके
बुलेट ट्रेनची स्थानके पारंपरिक रेल्वे स्थानकांपेक्षा वेगळी असणार आहेत. प्रवाशांच्या सुविधांसाठी आधुनिक टर्मिनल, पार्किंग, प्रवासी सुविधा आणि इतर सोयींनी युक्त अशी स्थानके उभारली जाणार आहेत. प्रत्येक स्थानकासाठी मोठ्या प्रमाणावर जागेची आवश्यकता असून, स्थानक परिसर विमानतळाच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे.
कर्नाटक आणि तेलंगणातही स्थानके
या मार्गावर कर्नाटकातील कलबुर्गी येथे थांबा प्रस्तावित आहे. तर तेलंगणामध्ये हैदराबाद विमानतळाजवळ कोकापेट, विकाराबाद आणि शमशाबाद ही स्थानके असतील. शमशाबादजवळ देखभाल डेपो उभारण्याचे नियोजन आहे.
भूसंपादन हे मोठे आव्हान
राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (NHSRCL) या प्रकल्पासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी भूसंपादन ही सर्वात मोठी प्रक्रिया मानली जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये या प्रकल्पाला गती देण्यात आली असून, DPR पूर्ण झाल्यानंतर संबंधित राज्यांकडून सहकार्य मागण्यात आले आहे.
तिकीट दर किफायतशीर ठेवण्याचा प्रयत्न
बुलेट ट्रेनचे तिकीट दर अद्याप निश्चित झालेले नाहीत. मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनचा प्रवास मध्यमवर्गीयांसाठीही परवडणारा ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?