एमपीएससीच्या पेपरफुटीची अशीही लव्ह स्टोरी!
लाडक्या लेकीसाठी अधिकार्याने पेपर फोडला, तिने प्रियकराला व्हाटसअप केला.. अन् पुढे प्रियकरासोबत ब्रेक अप.. पेपर फुटीचा यू टर्न
(विजयकुमार पिसे)
मुंबई: देशात आतापर्यंत २८ वेळा पेपर फुटीचे प्रक़ार घडले. महाराष्ट्रात एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रिया संदर्भातचा पेपर फुटण्याचे कारण मात्र भलतेच आहे. लाडक्या लेकीसाठी एमपीएससीच्या अधिकार्याने पेपर फोडला. तिने प्रियकराला दिला... अन पुढे लवस्टोरीत ट्विस्ट. ब्रेकअपमुळे आता तीन अधिकार्यांसह सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पेपर फुटीची ती *लेक मात्र अजून बाहेर आहे.
हे संपूर्ण प्रकरण लव्हस्टोरी आणि ब्रेकअपमुळे लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. या लव्हस्टोरीमधील प्रियकर आणि प्रेयसीच्या वडिलांना मुंबई पोलिसानी अटक केली आहे. या कथित लव्हस्टोरीची चर्चा आता रंगतदार झाली आहे. एमपीएससी अवर सचिव अभिजीत लेंडवे, सहा.कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते या तीन अधिकार्यांनाच अटक केल्यामुळे एमपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान या प्रकरणातील आणखी तीन आरोपीदेखील ताब्यात घेतले आहेत. यामध्ये नंदुरबारच्या कौटील्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटीलचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौटील्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटील हा पेपरफुटीचा दलाल असल्याचा दावा आहे. त्याने एमपीएससीच्या कनिष्ठ कर्मचार्यांना हताशी धरुन पेपर मिळवला,असा अंदाज आहे. याच प्रवीण पाटील कडून अमृत नामदेव पाटील याने प्रश्न पत्रिका खरेदी केली होती, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे अमृत पाटील यालाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
अमृत पाटीलने त्याची मुलगी ऋतुजा पाटील हिला ती प्रश्नपत्रिका दिली. हीच प्रश्नपत्रिका तिने प्रियकर लोकेश उर्फ गौरव पाटील याला देखील शेअर केली होती. पुढे परीक्षा झाल्यानंतर ऋतुजा पाटील पात्र झाली. तिची निवडही झाली. पण गौरवची निवड झाली नाही. त्यामुळे वाद वाढला. तेव्हा गौरव पाटील याने ऋतुजाची तक्रार एमपीएससीकडे केली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुप्तपणे तपास करून सर्वप्रथम गौरव पाटीलला अटक केली. मात्र ऋतुजा पाटलास अद्याप अटक केलेली नाही. तिला नोटीस देण्यात आली आहे. तर तिचे वडील अमृत पाटील याला अटक केली आहे.
पेपर फुटीचा तपास करताना पोलिसांनी ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांचे कॉल डिटेल्स, चॅट आणि इतर तांत्रिक गोष्टी तपासल्या. यामध्ये दोघांमध्ये पेपरफुटी बाबत चर्चा झाल्याचे पोलिसांना लक्षात आले आहे.
दरम्यान एमपीएससी औषध निरीक्षक पदासाठी पुनर्चाचणी परीक्षा घेणार आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केला आहे, त्यांना पुन्हा नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवीन तारीख आयोग लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करणार आहे.
What's Your Reaction?