चिंचवड ते पंढरपूर विहिंपची आषाढी आरोग्य वारी
वैद्यकीय सेवाकार्याचा ह.भ.प. संतोष महाराज काळोखे देहूकरांच्या हस्ते शुभारंभ, संत साहित्यातून योग्य आहार विहारांचे मार्गदर्शन
(विजयकुमार पिसे)
पिंपरी : ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकोबाराय आणि सर्व संतांनी आपल्या साहित्यातून वारीच्या काळात योग्य आहारविहार कसा असावा याचे मार्गदर्शन केले आहे, असे विचार महाराष्ट्र राज्य सकल संत विचार समितीचे अध्यक्ष ह. भ. प. संतोष महाराज काळोखे (देहूकर) यांनी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि पिंपरी,चिंचवड जिल्हा आयोजित चिंचवड ते पंढरपूर आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ काळोखे महाराज यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
निगडी प्राधिकरण येथे सावरकर मंडळ सभागृहात आयोजित विहिंपच्या आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याच्या शुभारंभप्रसंगी विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री अॅड. सतीश गोरडे, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, प्रांत उपाध्यक्षा माधवी सौंशी, उद्योजक सुरेश पटेल, जिल्हा अध्यक्ष अॅड. ललित झुनझुनवाला, जिल्हा मंत्री संभाजी बालघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
ह. भ. प. काळोखे देहूकर महाराज पुढे म्हणाले की, हरिभक्तांना वारीत चालण्याची ताकद अन् सतत नामस्मरणाचे बळ लाभावे यासाठी संतसाहित्यातून मार्गदर्शन करण्यात आले आहे. गेल्या ३९ वर्षांपासून विश्व हिंदू परिषद तोच विचार आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याच्या माध्यमातून समर्थपणे पुढे नेत आहे.
याप्रसंगी अॅड. सतीश गोरडे म्हणाले, प्लॅस्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक वारीसाठी विश्व हिंदू परिषद सुमारे ३९ वर्षांपासून आरोग्य सेवाकार्याचे आयोजन करीत असते. पिंपरी, चिंचवड येथील माऊली आणि तुकोबाराय यांची वारी तसेच नाशिक येथून येणारी संत निवृत्तीनाथ यांची वारी पूर्णत: पर्यावरणपूरक असावी ही काळजी घेण्यात येते. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि औद्योगिक आस्थापनांना केलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रत्येक वारीत सहा सुसज्ज रुग्णवाहिका, वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशिक्षित परिचारिका यांचे पथक, अत्यावश्यक औषधांचा साठा अशा उपलब्ध होतोे. यंदा आरोग्य सेवेचे चाळीसावे वर्ष असल्याचेही अॅड.गोरडे म्हणाले.
विश्व हिंदू परिषद प्रांत सेवा सहप्रमुख डॉ. शर्वरी यरगट्टीकर यांनी प्रास्ताविक केले. संभाजी बालघरे यांनी मनोगत व्यक्त केले. यशवंत देशपांडे, पी.एस. पुजारी व बाळासाहेब वाघ, अॅड. मनिषा नंदी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन किरण शिंदे, आभार अॅड. ललित झुनझुनवाला यांनी केले. संयोजन परेश पटेल, विजय देशपांडे, प्रशांत कुलकर्णी, सौ तेजस्विनीताई ढोमसे, नवनाथ साकोरे, अरविंद लंघे, पन्नालाल जाधव, कौशल रावल यांनी केले.
What's Your Reaction?