अखेर नागरिकांना दिलासा! ओम गर्जना चौक–बॉम्बे पार्क रस्त्याच्या कामाला सुरुवात

सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 26 मधील ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क रस्त्याच्या रखडलेल्या कामाला नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर सुरुवात झाली. नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Jul 2, 2026 - 11:46
 0  36
अखेर नागरिकांना दिलासा! ओम गर्जना चौक–बॉम्बे पार्क रस्त्याच्या कामाला सुरुवात

सोलापूर : प्रभाग क्रमांक २६ मधील ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क दरम्यानचा रखडलेला रस्ता अखेर मार्गी लागला आहे. ड्रेनेजचे काम पूर्ण होऊनही अनेक महिन्यांपासून रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महापालिकेने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ड्रेनेजसाठी खोदलेला रस्ता दुरुस्त न केल्यामुळे या मार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. त्यामुळे पादचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे त्रास वाढले होते, तर अनेक किरकोळ अपघातही घडले होते.

या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या; मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये होती. अखेर नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांची भेट घेऊन समस्या मांडली.

यानंतर २२ मे २०२६ रोजी राजश्री चव्हाण यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना लेखी निवेदन देत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने आता कामाला सुरुवात केली आहे.

रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल राजश्री चव्हाण यांचे आभार मानले. पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सक्रियपणे काम करत असल्याचे सांगत नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow