गहिनीनाथ महाराज औसेकर यांना ‘धार्मिक भूषण’ पुरस्कार
श्री औसेकर महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष, समाज प्रबोधनाच्या योगदानाबद्दल सन्मान
लातूर | प्रतिनिधी
धार्मिक, आध्यात्मिक आणि वारकरी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजप्रबोधनाचे कार्य करणारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे सहअध्यक्ष सद्गुरू श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना ‘धार्मिक भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गहिनीनाथ महाराज औसेकर हे वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक परंपरेचे जतन आणि प्रसार करण्याबरोबरच धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असतात. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या माध्यमातून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, धार्मिक परंपरा जपणे तसेच विविध आध्यात्मिक उपक्रमांना चालना देण्याच्या कार्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने त्यांना ‘धार्मिक भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
*धार्मिक आणि वारकरी परंपरेला योगदान..
पंढरपूर हे महाराष्ट्राच्या धार्मिक आणि वारकरी परंपरेचे प्रमुख केंद्र मानले जाते. आषाढी व कार्तिकी वारीसह वर्षभर लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. या भाविकांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा सन्मान राखत मंदिरातील विविध धार्मिक परंपरा आणि उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. वारकरी संप्रदायाची परंपरा, संत साहित्य, भक्ती आणि सामाजिक समरसतेचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यही त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. धार्मिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून ‘धार्मिक भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी याप्संगी सांगितले.
*मान्यवरांची उपस्थिती..
पुरस्कार वितरण सोहळ्यास रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, कायनेटिक इंजिनिअरिंगचे अजिंक्य फिरोदिया, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, सिद्धराज महाराज औसेकर यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.
*पुरस्काराने कार्याला नवी ऊर्जा..
‘धार्मिक भूषण’ पुरस्कार हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून धार्मिक आणि वारकरी परंपरेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सन्मानामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळून समाजप्रबोधनाच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.
श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना ‘धार्मिक भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील वारकरी, भाविक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
*लक्ष्यवेध परिवाराचे वतीने श्री औसेकर महाराज यांचे मनःपूर्वक अभिनंदन
What's Your Reaction?