प्रभाग २६ मधील उखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; राजश्री चव्हाण यांचा मनपाकडे पाठपुरावा
सोलापूरच्या प्रभाग २६ मधील उखडलेल्या रस्त्यांच्या समस्येवर राजश्री चव्हाण यांचा मनपाकडे पाठपुरावा. पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची मागणी; अन्यथा मोर्चाचा इशारा.
सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील प्रभाग क्रमांक २६ मधील ड्रेनेज कामांनंतर उखडून ठेवलेल्या रस्त्यांच्या समस्येबाबत भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या तथा माजी नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांनी सोलापूर महानगरपालिकेकडे निवेदन देत तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे.
लक्ष्मी कन्स्ट्रक्शनकडून ड्रेनेजची कामे करण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी रस्ते खोदलेल्या अवस्थेतच असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इस्टिमेटनुसार काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करणे आवश्यक असतानाही अद्याप डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही.
ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क, कृष्णा कॉलनी, शिक्षक सोसायटी, गुरुदेव दत्त नगर भाग १ ते ५, हेरिटेज फ्रॉम, प्रियांका नगर, पंचवटी नगर, विश्व नगर आणि रोहिणी नगर भाग १ या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था गंभीर बनली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना लेखी निवेदन देण्यात आले. कामे तातडीने न झाल्यास जुळे सोलापूरमधील नागरिकांसह महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना तातडीने फोनवरून सूचना देत आठवडाभरात कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. लवकरच रस्ते दुरुस्त करून नागरिकांना दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनीही प्रभागातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
What's Your Reaction?