Monsoon Update : कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सून रखडला; मुंबईत उष्णतेचा कहर

मुंबईत मान्सूनचे आगमन लांबल्याने उकाडा आणि तापमानात वाढ झाली आहे. रात्रीचे तापमान ३० अंशांपर्यंत पोहोचले असून हवामान विभागाने १५ जूनच्या आसपास मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Jun 10, 2026 - 11:35
 0  10
Monsoon Update : कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सून रखडला; मुंबईत उष्णतेचा कहर

मुंबई : जून महिन्याचा पहिला आठवडा संपला असला तरी मुंबईकरांना अद्याप मान्सूनची प्रतीक्षा करावी लागत आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी कोरड्या वाऱ्यांमुळे त्याच्या पुढील प्रवासाला विलंब होत असल्याने मुंबईत उष्णता आणि उकाड्याचा त्रास वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जूनच्या आसपास मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबईत दिवसा तीव्र उष्णता जाणवत असून रात्रीही नागरिकांना दिलासा मिळत नाही. विशेष म्हणजे शहरातील रात्रीचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे दिवसभराच्या कडक उन्हानंतरही उकाड्याचा सामना करावा लागत असल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.

हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रातील वातावरणीय बदल आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग मंदावला आहे. त्यामुळे अपेक्षित वेळेपेक्षा काही दिवस उशिराने मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मान्सूनच्या आगमनाची वेळ बदलती

मुंबईत मान्सून आगमनाची सरासरी तारीख साधारणपणे १० ते ११ जून मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता मान्सूनच्या आगमनात मोठी अनिश्चितता दिसून येत आहे.

  • २०२५: २६ मे रोजी मान्सूनचे विक्रमी आगमन
  • २०२४: ९ जून रोजी मान्सून दाखल
  • २०२३: २५ जून रोजी उशिरा आगमन
  • २००१ नंतरचा सर्वाधिक उशिरा आलेला मान्सून : २०२३

सध्या वाढत्या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन प्रभावित झाले असून आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow