प्रस्थापित नेते आणि त्यांच्या वारसांकडेच डीसीसी बँकेचा वारसा
सहकार पॅनलमध्ये ओरिजनल भाजपा किती? काँग्रेसी/राष्ट्रवादी विचारांची तिसरी पिढी भाजपा कोट्यातून संचालक, आ.परिचारक, आ.राऊत, आ.कल्याणशेट्टी, मनीष देशमुख असे मोजकेच भाजपाई, बाकींचा विचार आणि वारसा?
(विजयकुमार पिसे)
अविरोध हवेतील गप्पा होत्या, हे एव्हाना लक्षात आले असेलच. असो. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या यंदाच्या निवडणुकीत भाजपाला छप्पर फाड के यश मिळालं, जे बिनविरोध निवडून आलेले त्यामध्ये अपवाद माजी आ.प्रशांत परिचारक, आ.राजेंद्र राऊत आणि आ.सचिन कल्याणशेट्टी यांचा. बाकी नावं पाहिली तर प्रस्थापित नेते आणि त्यांच्या वारसांकडेच डीसीसी बँकेचा वारसा असल्याचे अधोरेखित होते. काँग्रेसी/राष्ट्रवादी विचारांची तिसरी पिढी भाजपा कोट्यातून संचालक झालेत, उर्वरित निवडणुकीनंतर होतील. त्यामुळे विचार,विरासत आणि वारसा याचेशी काही देणेघेणे नाही, असा निष्कर्ष 'परिवार' व 'वैचारिक' बांधिलकी मानणार्या घटकाकडून काढला जाईल. शिवाय बड्या प्रस्थापित नेत्यांनी येथेही आपले कुटुंब नियोजन व्यवस्थित केले आहे. असो. बिनविरोध निवडून आलेल्या दहा संचालकांचे सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
आता यंग जनरेशन... तिसर्या पिढीकडे डीसीसी बॅंकेची सूत्रे
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक आखाड्याचे चित्र आज १७ रोजी उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले असून, ९ जागांसाठी सहकार विकास पॅनलच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल लढणार आहे. स्वाभिमानी पॅनलमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी,ठाकरे सेना,शेकाप आणि शिंदे सेना आहे.
आज १९ पैकी १० जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये सोसायटी गटात ९ आणि ओबीसी गटात एक जागा असून त्या सर्व सहकार पॅनलने जिंकल्या आहेत. बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये माजी आ.प्रशांत परिचारक, आ.राजेंद्र राऊत, आ.सचिन कल्याणशेट्टी, पृथ्वीराज माने (दिलीप माने), यशवंत शिंदे (संजय मामा शिंदे), श्रीदीप हसापुरे (सुरेश हसापुरे), शंभूराज जगताप (जयवंतराव जगताप), बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील (दोघे राजन पाटील अनगरकर), सिध्देश्वर अवताडे (बबनराव आवताडे) यांचा समावेश आहे. आ.राऊत आणि आ.कल्याणशेटटी वगळता अन्य बिनविरोध संचालक हे जवळपास दुसर्या/तिसर्या पिढीचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
मोहिते/पाटील गटाच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलमध्ये भाजपा वगळता काँग्रेस,राष्ट्रवादी, ठाकरे सेना,शेकाप आणि शिंदे सेना म्हणजे महायुती आणि मविआच्या घटक पक्षांचा समावेश आहे. या पॅनलमध्ये माळशिरस विकास सोसायटी गट : अर्जुनसिंह मोहिते-पाटील, महिला प्रतिनिधी गट : सिंधू सुरेश पाटील आणि अस्मिता सुरेश गायकवाड, अनुसूचित जाती-जमाती गट : दत्तात्रय खडतरे, विमुक्त जाती व भटक्या जमाती गट : अनिकेत चंद्रकांत देशमुख (शेकापचे माजी मंत्री गणपतराव देशमुखांचे नातू), कृषी व पणन गट : संग्रामसिंह जहागीरदार, दुग्ध संस्था गट : शिवाजी बलभीम पाटील, तर नागरी बँका गट : नगरसेवक अमोल बाळासाहेब शिंदे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनलमध्ये सांगोला विकास सोसायटी गट : आ. बाबासाहेब देशमुख (शेकाप), माळशिरस विकास सोसायटी गट : शहाजीराजे देशमुख, नागरी बँका गट : मनीष सुभाष देशमुख (भाजपा), महिला गट : माजी आ.शामल दिगंबरराव बागल (श.प.) आणि अर्चना दिलीप घाडगे, अनुसूचित जाती-जमाती गट : महादेव किसन कांबळे, विमुक्त जाती व भटक्या जमाती गट : राजेंद्र धुळप्पा बंदीछोडे, कृषी व पणन गट : रणजितसिंह बबनराव शिंदे (श.प.), तर दुग्ध संस्था गट : सूर्यादित्य दीपक आबा साळुंखे (श.प.) निवडणूक रिंगणात आहेत.
या निवडणुकीचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे आ.दिलीप सोपल, राजन पाटील अनगरकर, रणजीत सिंह मोहिते पाटील, बबनराव शिंदे, संजय मामा शिंदे, दिलीप माने, दीपक आबा साळुंके, अक्कलकोटचे माजी आ.सिद्रामप्पा पाटील परिवार, राजशेखर शिवदारे, बबनराव आवताडे यांना डीसीसीचे द्वार बंद झाले आहे. तर राज्याचे सहकारमंत्रीपद भूषविलेले आ.सुभाष बापू देशमुख यांनी यापूर्वी अनेकदा डीसीसी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस/राष्ट्रवादी या बलाढ्य शक्तींच्या विरोधात दोन हात केले. पण आज "सब कुछ" भाजपा असूनही पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाला संधी मिळू शकली नाही. तसेच भाजपा केडर चालवणार्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना देखील सहकार क्षेत्रात डावलले. तसेच प्रदेश कार्य. सदस्य शहाजीभाऊ पवार, माजी महापौर शोभा बनशेट्टीसह अनेक भाजपाई यांनाही माघार घ्यावी लागली, याची खंत आहे.
What's Your Reaction?