दिड्डी काका, जाधव, गोरंटला, संगा आक्रमक; शहर मध्य मतदारसंघात चुरस
दिड्डी काका, जाधव, गोरंटला, संगा आक्रमक; शहर मध्य मतदारसंघात चुरस

सोलापूर : शहर मध्य मतदार संघ भाजपला सुटणार, हे अधोरेखित झाले, पण उमेदवारीवरून घमासान सुरू झाले आहे. दिड्डी, जाधव, गोरंटला, संगा आक्रमक झाले आहेत. शहर मध्य मतदार संघात निष्ठावंत, जुने कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, कारण ही लढाई निर्णायक आहे. "अभी नही तो कभी नही", या भूमिकेतून भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी काका, उपाध्यक्ष अनंत जाधव, अंबादास गोरंटला आणि श्रीनिवास संगा यांनी आक्रमक भूमिका घेत उमेदवारीवर दवा केला आहे.
तीन महिन्यापूर्वी भाजपात आलेले देवेंद्र कोठे नको, ३० वर्षापासून कार्यरत आमच्यापैकी कोणालाही संधी द्या, अशी या चौघांची मागणी आहे. तसेच या संदर्भात दिड्डी, जाधव, गोरंटला आणि संगा यांनी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांना निवेदनही सादर केले आहे. शहर मध्य हा मतदारसंघ भाजपा प्रभाव क्षेत्राखाली आहे. पक्षाचे संघटन कोणाच्या नेतृत्वामुळे नाही. त्यामुळे प्रणिती शिंदे यांना फक्त 894 इतके मिळालेले मताधिक्य याचे श्रेय परंपरेने आलेले पक्षाचे संघटन व कार्यकर्ते यांनाच जाते. याचे श्रेय घेऊन कुणी उमेदवारीवर दावा करत असेल तर तो केवळ देखावा ठरेल. आणि त्याचा फटका बसेल. म्हणून नेता नको, कार्यकर्तालाच संधी द्या, निष्ठावंतांना उमेदवारी द्या, असे पांडुरंग दिड्डी, अनंत जाधव, अंबादास गोरंटला आणि श्रीनिवास संगा यांनी सांगितले. दरम्यान यासंदर्भात या चौघांनी एकत्रित बैठक घेऊन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील निवेदन देऊन कोठे यांना विरोध केला आहे. तसे झाल्यास पक्षाला फटका बसेल, असेही नमूद केले आहे.
भाजपामध्ये तीन महिन्यापूर्वी प्रवेश केलेले कोठे दावेदार कसे? तसेच त्यांचे काका महेश कोठे यांना शहर उत्तर मधून शरद पवार कांग्रेसची भाजप विरोधात उमेदवारी जाहीर झाली आहे, याकडे ही या इच्छुकांनी लक्ष वेधले आहे. म्हणून कोठे यांना उमेदवारी देऊ नये, असे म्हणत, भाजप कार्यालयात या चौघांनी शक्तीप्रदर्शन केले व शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना लेखी पत्र दिले. आणि तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देखील पाठवले आहे. यावेळी भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आक्रमक भूमिकेविषयी श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?






