दुष्काळात आमदारांचा शेतकर्‍यांना दिलासा; पशुधन वाचवणार, चारा, पाण्याचीही सुविधा

वाढदिवस साजरा न करता आमदार विजयकुमार देशमुखांनी जपली सामाजिक बांधिलकी! आ.सुभाषबापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होटगीचे शिवानंद पाटील परिवाराचा यत्नाळ येथे शेतकरी संवादासाठी पुढाकार

Oct 23, 2026 - 00:44
Oct 23, 2026 - 00:47
 0  32
दुष्काळात आमदारांचा शेतकर्‍यांना दिलासा; पशुधन वाचवणार, चारा, पाण्याचीही सुविधा

सोलापूर :   दुष्काळाच्या यादीत दक्षिण सोलापूरचे नाव नाही, अशी आवई प्रारंभी समाजमाध्यमावर उठवली गेली. शासनाने दक्षिण सोलापूरचा समावेश केलाच. या भागात पशुधन वाचवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी मुबलक चारा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करण्याचा संकल्प सोलापूरचे भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला आहे. २१ ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस. दुष्काळामुळे यंदा वाढदिवस साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी थेट यत्नाळ गावात जाऊन हजारो शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला. संकटापुढे हार मानू. खचू नका. बरेवाईट करून घेऊ नका. आपत्तीचा मुकाबला आपण सारे मिळून करू. आम्ही सोबत आहोत, असे अभिवचनही त्यांनी बसवेश्‍वर मंदिरात शेतकरी संवाद प्रसंगी दिले. काशी पीठाचे जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन विश्‍वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या साक्षीने तसेच दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या उपस्थितीत दिले.
    दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देत, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने भाजपा नगरसेवक शिवानंद पाटील परिवारच्या वतीने यत्नाळ येथे शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
    शेतकरी कुटूंब व समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि संवेदनशीलता जपणारा हा उपक्रम स्तुत्य ठरला. कारण येथे केवळ आश्‍वासन नाही, तर कृतीशील कार्यवाही करण्याचा निश्‍चयही करण्यात आला. आणि  विशेष म्हणजे या नैसर्गिक़ संकटावर मात करण्यासाठी बळ यावे म्हणून काशी पीठ जगद्गुरू हे देखील आवर्जून उपस्थित होते.
    आमदार श्री. सुभाषबापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, नगरसेवक श्री. शिवानंद पाटील यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाला यतनाळ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, सोलापुरातील नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी आमदार श्री. सुभाषबापू देशमुख, आमदार श्री. विजय देशमुख आणि जगद्गुरूपूज्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधत दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. दुष्काळामुळे शेतीसमोर उभ्या राहणार्‍या विविध समस्या, पाण्याची कमतरता, पिकांचे संरक्षण, पशुधन जनावरांच्या चार्‍याची उपलब्धता आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.


     दुष्काळाच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन आणि उपलब्ध संसाधनांचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. तसेच शेतीचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, जनावरांसाठी चारा व पाण्याची योग्य व्यवस्था करणे आणि शेतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करणे, याबाबत उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.
     संकट कितीही मोठे असले, तरी योग्य नियोजन, एकजूट आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर त्यावर मात करता येऊ शकते, हा सकारात्मक संदेश संवादातून या भाजपा लोकप्रतिनिधींनी दिला.
विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी लघुउद्योग, घरगुती व्यवसाय आणि उपलब्ध साधनसंपत्तीच्या आधारे छोटे-मोठे उद्योग सुरू करून कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर घालावी, असे आवाहनही केले. महिलांच्या कौशल्याला आणि मेहनतीला योग्य दिशा मिळाल्यास ग्रामीण कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते, तसेच कठीण काळात कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो, हा विचार यावेळी मांडण्यात आला.    
   आ.सुभाषबापू यांनी लोकमंगलच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे यंदा दुष्काळावर मात करण्यासाठी याचाही विचार करण्याचे निश्‍चित झाले. शेतकर्‍यांनी संकटाच्या काळात खचून न जाता एकमेकांना सहकार्य करावे आणि उपलब्ध संधींचा योग्य वापर करून परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, हा निर्धारही केला.


    वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी! ही भावना जपत आमदार श्री. विजय देशमुख यांनी दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा घेतलेला निर्णय आणि शेतकरी बांधवांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेला हा संवाद कार्यक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला. 
    शेतकरी जगला, तर शेती जगेल; शेती जगली, तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल! या भावनेतून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये नव्या आशेचा किरण निर्माण करण्यासाठी होटगीच्या पाटील परिवाराने आयोजित केलेला शेतकरी संवाद कार्यक्रम निश्‍चितच प्रेरणादायी ठरला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow