खानदानी पाटील ऐवजी, आता "खानदानी ओबीसी पॅटर्न"वर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
अजीतदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांची अनगरकरांवर बोचरी टीका, नवभाजपाई माधव पॅटर्नपासून दूरदूर, घराणेशाही आणि दिवाळखोरीचीही चर्चा
(विजयकुमार पिसे)
मुंबई : महाराष्ट्र भाजपाच्या उभारणीत आणि बांधणीत माधव पॅटर्न (संघटनमंत्री स्व.वसंतराव भागवत यांची देण) निर्णायक ठरला आहे. पण आज सोलापूर जिल्ह्यात याच्याशी काही देणेघेणे नाही, असे वातावरण असून बाहेरून आलेली मंडळीच पक्ष चालवताहेत काय? अशा वातावरणामुळे मूळ विचारधारेची मंडळी उपरे नेतृत्वाशी अंतर ठेवून आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ओबीस (इतर मागास प्रवर्ग) राख़ीव प्रवर्गात खुल्या गटातील अनगरचे अजिंक्यराणा पाटील यांच्या बिनविरोध निवडीविषयी सर्वत्र सखेदाश्चर्य व्यक्त केले जात आहे. असो.
हाच धागा पकडून राष्ट्रवादी (ए) गटाचे प्रवक्तेे उमेश पाटील यांनी मोहोळच्या अनगरकर पाटलांवर हल्लाबोल केला आहे. पूर्वी स्वतःला जाहीरपणे 'खानदानी पाटील' म्हणून घेणार्यांनी आता स्वतःला 'खानदानी ओबीसी' म्हणायला सुरुवात करावी, असा टोलाही त्यांनी लगावला. वास्तविक ओबीसी कॅटेगरीत खुल्या वर्गाचा उमेदवार ही बाब बँकेच्या निवडणुकीचे नेतृत्व करणार्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवले की काय? अशी शंका देखील उपस्थित होत आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आणि अनगरकर पाटील यांच्यात पूर्वीपासूनच टोकाचे वाद आहेत. यात भर पडली ओबीसीमधून खुल्या वर्गातील अजिंक्यराणा पाटील बिनविरोध जाण्याची. भाजपा किंवा समविचारी पक्षांकडे इच्छुक उमेदवार होते. त्यांना डावलून किंवा त्यांचे विथड्रॉल/माघार घेऊन अजिंक्यराणा यांनाच संधी देण्याचे प्रयोजन काय? त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळराजे हे देखील बँकेत बिनविरोध गेले आहेत. एकाच घरातील दोन भाऊ बिनविरोध देउन भाजपाने ओबीसी व अन्य इच्छुक जुन्या कार्यकर्त्यांवर अन्यायच केला आहे. त्यामुळे 19 पैकी दहा जागा बिनविरोध जिंकून देखील विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. यामध्ये भाजपाचे मूळ 'माधव पॅटर्न' डावलल्यामुळे भाजपाची नाहक बदनामी होत असल्याचे चित्र आहे.
पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट या तालुक्यांमधून माजी आ. परिचारक, आ. राऊत, आ.कल्याणशेट्टी यांना संधी मिळाली, पण त्यांनी सोबत आपल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनाही बँकेत संधी दिली आहे. कुटुंब/परिवारवाद न जोपासता त्यांनी आदर्श उदाहरण दिले आहे. डीसीसी बँक निवडणुकीचे नेतृत्व करणारी मंडळीनी अनगरकरांना झुकते माप का दिले, असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष असूनही अजीतदादा गटाचा हल्लाबोल अधिक तीव्र आहे. म्हणून ओबीसी प्रवर्गाच्या जागेवरून उमेश पाटलांनी संधी न दवडता टोला लगावताना पूर्वी स्वतःला जाहीरपणे खानदानी पाटील म्हणून घेणार्यांनी आता स्वतःला खानदानी ओबीसी म्हणायला सुरुवात करावी, अशी बोचरी टीका केली आहे.
शिवाय उमेश पाटलांनी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावरूनही त्यांना लक्ष्य केले आहे. राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र, विक्रांत उर्फ बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवडून आल्यानंतर उमेश पाटील म्हणाले, ...#### बँक लुटून खाल्ली, आता उरलेली बँक पुढची पिढी लुटणार का? असा थेट सवालही केला आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक राहिलेल्यांना किंवा वसुल थकीत माजी संचालकांना नवीन सहकार कायद्यान्वये निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलांना पुढे करून बँकेवर पुन्हा ताबा मिळवण्याचा घराणेशाहीचा मार्ग शोधला आहे. (वास्तविक भाजपा घराणेशाही? मानत नाही) यामध्ये केवळ अनगरकर पाटीलच नाहीत तर अन्य माजी संचालकदेखील आहेत, हे विशेष.
ही पृष्ठभूमी लक्षात घेता निवडणूक झाल्यानंतर बँकेतील ठेवी काढून घेण्याचे आवाहन देखील केले जात आहे. नवीन संचालक मंडळ सत्तेत आल्यानंतर बँक 100 टक्के दिवाळखोरीत जाईल, असा दावा करून शेतकरी आणि खातेदारांनी डीसीसी बँकेत नवीन ठेवी ठेवू नयेत व जुन्या ठेवी काढून घ्याव्यात, असे आवाहन उमेश पाटील यांनी केले आहे.
महायुतीच्या घटक पक्षाकडूनच अशा गंभीर टीकाटिपणीत भाजपाला लक्ष्य केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराचा ज्वर आणि जोर वाढला तरी प्रचाराचे वातावरण भलत्याच दिशेने जात आहे. महापालिका, जिल्हा परिषद, आणि विधान परिषदेच्या दोन निवडणुकांमधून भाजपाचा दृष्टीकोन काय याविषयी मूळ विचारधारा मानणार्यांनी पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवले आहे. तसेच माधव पॅटर्नविषयी सर्वाधिक चिंता व्यक्त होत आहे.
*जाता जाता... : प्रस्थापित नेते आणि त्यांच्या वारसांकडेच डीसीसी बँकेचा वारसा हा लक्ष्यवेधचा (18 नोव्हेंबर 2026)नॅरेटिव परफेक्ट ठरतोय. माध्यमं आणि मिडियाकडून नंतर अशाच बातम्यांची मांडणी सुरू झाली.
What's Your Reaction?