उड्डाणपूल, पाणीपुरवठा, आयटी पार्क, विमानसेवा विषय मुख्यमंत्र्यांकडून लागला मार्गी
मनपा रोजंदारी आणि वाहन चालकांचा विषयही लवकरच सुटणार :पालकमंत्री गोरे; आ.देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा
सोलापूर : सोलापुरातील दोन उड्डाणपूल बांधण्यासाठी पोस्ट, रेल्वे तसेच राज्य शासनाच्या जागा १५ दिवसात ताब्यात घेऊन ऑगस्टपूर्वी वर्क ऑर्डर देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच पाणीपुरवठ्यासाठी १४०० कोटींच्या योजनेच्या कामाची निविदा १५ सप्टेंबर पर्यंत व ३० नोव्हेंबरच्या आत वर्क ऑर्डर काढण्याच्या सूचना देखील फडणवीस यांनी दिल्या. शहर विकासाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशना दरम्यान विशेष बैठकीत आढावा घेतला. याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली. या विविध निर्णयांमुळे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
या बैठकीस ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. देवेंद्र कोठे, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, विमान प्राधिकरणाचे दीपक कपूर, वरिष्ठ अधिकारी श्रीकर परदेशी, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, उड्डाणपुलाचा विषय शासकीय जागांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे प्रलंबित होता. आ.कोठे यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक घेऊन उड्डाणपुलाचा प्रश्न सोडवला आहे. शासनाच्या जमिनीसाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात येईल. दीड ते दोन महिन्यात उड्डाणपुलाची वर्क ऑर्डर व कामाला सुरुवात होईल, असेही पालकमंत्री गोरे म्हणाले. पाणीपुरवठा योजनेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत निविदा प्रकाशित करून ३० नोव्हेंबरच्या आत वर्क ऑर्डर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले. समांतर जलवाहिनी झाली तरी दररोज पाणीपुरवठ्यासाठी अंतर्गत जलवाहिन्या बदलण्याची आवश्यकता आहे. या योजनेसाठी जागतिक बँक, राज्य शासन हिस्सा, मनपाची भूमिका यावरही चर्चा झाली.
सोलापूर विमानसेवेचीही चर्चा झाली. विमानसेवा पूर्ववत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. सोलापुरातील नाईट लँडिंग, विमानतळ परिसरातील अतिक्रमणावरही यावेळी चर्चा करण्यात आली. बोरामणी विमानतळबाबत फडणवीस यांनी कार्यवाहीचे निर्देश विमान प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कपूर यांना दिले.
१५ ऑगस्टपर्यंत २५ ई-बस मिळाव्यात याविषयी चर्चा झाली. पालिकेच्या २४९ रोजंदारी आणि वाहन चालकांना कायम सेवेत घेणेविषयी फडणवीस यांनी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांना सूचना दिल्याचे आ. देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
*आयटी पार्कसाठी ७ दिवसांत जागा
सोलापूर आयटी पार्कसाठी जलसंपदा खात्याची जागा सात दिवसात विनामूल्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत दिल्या. अनेक महिन्यांपासून प्रलंबित उड्डाणपूल, पाणीपुरवठा योजना, आयटी पार्क, विमानसेवा, बस सेवा रोजंदारी, वाहन चालकांचा विषय असे अनेक विकासाचे प्रश्न घेऊन पालकमंत्री गोरे आणि आ.कोठे यांनी एकत्र मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत विकासकामांचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गोरे यांचे आमदार देवेंद्र कोठे यांनी विकास कामाचे विषय मार्गी लावलेबद्दल आभार मानले आहेत.
What's Your Reaction?