एस.कार्तिकेयन सोलापूरचे जिल्हाधिकारी, आशीर्वाद यांची नागपूरला बदली
फडणवीसांच्या होमग्राउंडवर पाचारण, मोदींनीही केले होते आशीर्वाद यांचे कौतुक
सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली झाली असून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांची सोलापूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हयात केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना होमग्राउंडवर पाचारण केले आहे.
सोलापूरपेक्षा नागपूरचा आवाका निश्चितच मोठा आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री मोदी यांनी सोलापूर दौर्यावर असताना कुमार आशीर्वाद यांच्या कामाची स्तुती केली होती.
राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील कार्यकाळात प्रशासनातील विविध उपक्रम राबविताना विकासकामांना गती दिली. विशेषतः महसूल, आपत्ती व्यवस्थापन, तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रशासनात शिस्त आणि कार्यक्षमता वाढल्याचे मानले जाते. विशेषत: पंढरपूर वारीचे नियोजन, 56 एकर जागेत वारीची सोय तसेच वारीच्या काळात दिंड्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी खास निवारा व्यवस्था वाखाणण्याजोगी होती. आशीर्वाद यांच्या काळात रे नगर घरकुल योजना पूर्णत्वास नेली, याचे कौतुक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते.
दरम्यान कुमार आशीर्वाद शुक्रवारी 3 एप्रिल रोजी आपला पदभार नूतन जिल्हाधिक़ारी कार्तिकेयन यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.
What's Your Reaction?