भाजपातील Gen-Z सरसावली,स्वीकृत आणि परिवहनचे स्टेअरिंग द्या

पक्षाला दिला प्रभावी शब्दात संदेश, संघटनेसाठी युवा मोर्चाचे मोठे योगदान आणि समर्पण, मात्र मनपा निवडणुकीत व स्वीकृतसाठी संधी नाही

Aug 13, 2026 - 12:13
 0  100
भाजपातील Gen-Z सरसावली,स्वीकृत आणि परिवहनचे स्टेअरिंग द्या

(विजयकुमार पिसे)
   जंतर मंतर, नंतर पुढे काय? असा रोकडा सवाल आता  भाजपातील Gen-Z नेच उपस्थित केला आहे. निवडणुका झाल्या, पदाधिकारी निवडले, स्वीकृत नगरसेवकही *हुश्श्य झालेे. डीपीडीसी वा महामंडळे, शासकीय समित्यांचा अजून पत्ता दिसत नाय. यामुळे पक्ष संघटनेला प्रभावी संदेश देण्याची हीच योग्य वेळ, अन्यथा..। म्हणून एकमेव रिक्त स्वीकृत नगरसेवक आणि परिवहन समितीचे स्टेअरिंग द्या, यासाठी पक्षाध्यक्षांना साकडे घातले आहे. येत्या२० तारखेला मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सोलापुरात येत आहेत, त्या पृष्ठभूमीवर भाजयुमोची मागणी निर्णायक ठरेल काय?
   संघटनेसाठी मोठे योगदान आणि समर्पण देऊनही त्याची जाणीव नेतेमंडळींना नसेल तर? Gen-Z स्वस्थ कशी बसेल. म्हणून अभी नही तो, कभी नही, या भूमिकेतून बुधवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन शहर अध्यक्ष विजय कुलथे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने नेहमीच युवा मोर्चाच्या माध्यमातून नव्या नेतृत्वाला संधी देण्याची परंपरा जपली आहे. आजचा काळ नव्या पिढीच्या (Gen-Z) नेतृत्वाचा असून युवकांना जबाबदारी देणे ही *काळाची गरज आहे. भारतीय जनता युवा मोर्चा हा पक्षाचा सक्रिय व समर्पित घटक असून पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीत आंदोलनात व संघटनात्मक उपक्रमात युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे उल्लेखनीय योगदान असते. मात्र सहा महिन्यापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत युवा मोर्चाचे मोठे योगदान असूनही भाजपा युवा मोर्चाच्या एकाही कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली नाही. तसेच महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीमध्येही युवा मोर्चाला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे किमान नववे स्वीकृत सदस्य पद भारतीय जनता युवा मोर्चाला देण्यात यावे. तसेच महापालिकेच्या परिवहन समितीवर युवा मोर्चाच्या किमान पाच कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे.
   भाजपाकडून भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना संधी दिल्यास त्यांचा उत्साह वाढेल. पक्षाला सक्षम आणि दीर्घकालीन नेतृत्व मिळेल. तसेच भारतीय जनता पक्ष युवकांना संधी देणारा पक्ष असल्याचा समाजात अधिक प्रभावी संदेश जाईल. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली आहे. पत्रातील शब्द व वाक्यरचना  योजून  वापरले आहेत. त्यामुळे भाजपातील Gen-Z (जुन्या *निष्ठावंतांप्रमाणे) केवळ *सतरंज्या घालणारी नव्हे, तर त्यांना दायित्वाप्रमाणे अधिक़ारही हवेत,असा ध्वनितार्थ आहे. 
   जंतर मंतर नंतर मा.सरसंघचालकांनी युवकांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जेन झी देशविरोधी नाहीत. ते आपलेच लोक आहेत. ती आपल्या देशाची पुढची पिढी आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले होते. 
   पण सत्ताधारी मंडळींकडून याबाबत अद्याप सकारात्मक हालचाल दिसत नाही. त्यामुळे भाजपातील Gen-Z सरसावली, असे मानले जात आहे.
   बुधवारी पक्ष कार्यालयात निवेदन देताना भाजयुमोचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, विश्‍वनाथ प्याटी, मयूर घुगे, यतिराज होनमाने, आकाश मुदगल, अंबादास पामु, अर्जुन मोहिते, ऋषिकेश चिट्टे, शिवानंद कावडे, राहुल डांगरे, देवेंद्र डेरबेरे, संदीप महाले, विशाल बनसोडे, लक्ष्मण सरवदे, प्रवीण गलांडे, ओंकार पत्तेवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow