लातूर पॅटर्नला घरघर, शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या!
शिक्षण क्षेत्रात आदर्श प्रस्थापित लातूर बदनाम; मोटेगावकरने 'नीट' पेपर फोडला, संजीव सोनवणेनी आत्महत्या केली: आणखी बरंच काही...
लातूर | शिक्षणात पुण्याचा डंका, तर मागासलेल्या मराठवाड्यात 'लातूर पॅटर्न'चा दबदबा... असा एक काळ. आज त्या पॅटर्नला घरघर लागली आहे. मंगळवारी येथील प्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं. लातूरमधील येथील राहत्या घरी हा ध़क्कादायक प्रकार घडला. यामुळे शिक्षण क्षेत्र हादरून गेलं आहे.
लातूर म्हटलं की खाजगी क्लासेसचं पेवं. हमखास यशाची खात्री देणारे शिवराज मोटेगावकर असतील आणि असे अनेक नामचीन शिक्षण तज्ञ. मात्र मागील काही दिवसांपासून खासगी शिकवणीमुळे अनेक महाविद्यालयांना,शिक्षण संस्थांना उतरती कळा लागली आहे. मोटेगावकर तर सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. या प्रकाराने लातूरची बदनामी तर झालीच, शिवाय अनेक संस्थाचालकांची कोेंडी देखील झाली आहे.
आज लातूरमध्ये आणखी एक धक्कादायक प्रक़ार घडला. शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे यांनी डोक्यात गोळ्या झाडून स्वत:चं आयुष्य संपवलं. ६२वर्षीय सोनवणे शहरातील पद्मानगर भागात राहतात. लातूर, सोलापूर, येडशीपर्यंत त्यांचा शैक्षणिक पसारा आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांनी पोलिसांना आवाहन केलं असून माझ्या आत्महत्येचा तपास करू नये, कोणास जबाबदार धरू नये, असं त्या चिठ्ठीत लिहिलंय, अशी माहिती आहे.
दरम्यान त्यांचे हितचिंतक मित्रपरिवाराकडून कळालेली माहिती अशी की, खासगी शिकवणी क्लासेसमुळे त्यांच्या शाळा, महाविद्यालयांना उतरती कळा लागली आहे. त्या नैराश्येतूनच संजीव सोनवणे यांनी टोकाचं पाऊल उचललं, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र पोलीस विविध घटनाक्रमाने सोनवणे यांच्या आत्महत्येचं गूढ शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
What's Your Reaction?