मोहिते-पाटील, परिचारक गट आज वेधून घेणार लक्ष
डीसीसी बॅंक निवडणूक अर्जासाठी आज अखेरचा दिवस, भाजपात नवे,जुने व शिंदे सेनेची कुस्ती निर्णायक
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदेसेना, राष्ट्रवादीमध्ये दोस्तीत कुस्ती असा सामना पाहायला मिळाला. भाजप व अजीत दादा गटाला त्याची
किंमत मोजावी लागली. आता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आज उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अकलूजकर मोहिते-पाटील आणि परिचारक गटाचा पेटारा आज उघडणार आहे. उमेदवारी अर्ज कुणाचे दाखल होतील, याकडे लक्ष आहे.
दरम्यान शिंदे सेनेच्या नेत्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. यापूर्वीचा अनुभव पाहता त्यांचे भाजपशी किती सख्य राहील, हे अनिश्चित आहे. गुरुवारी शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मुलासह अर्ज भरले. शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनीही अर्ज दाखल केला. यांची ताकद किती यापेक्षा उपद्रवमूल्य ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदेसेना सामना रंगणार काय? अशी चर्चा आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपते. तेव्हा कुणाचे अर्ज येतात व आणखी कोण मैदानात उतरतो, याचीही उत्सुकता आहे.
दरम्यान, गुरुवारी आ. सुभाष देशमुख व माजी आमदार राजन पाटील यांनी मुलांसह अर्ज दाखल केले. तसेच आ. सचिन कल्याणशेट्टी पहिल्यांदाच अर्ज भरला आहे. सिध्दाराम म्हेत्रेनी मुलगा प्रथमेश म्हेत्रे मार्फत ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला. काल एकाच दिवसात ५४ अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत एकूण उमेदवारी अर्ज ६९ आहेत.
यामध्ये बार्शी : राऊत रणवीर, माढा : रणजितसिंह शिंदे, मोहोळ : विक्रांत पाटील, राजन पाटील. पंढरपूर : कल्याण काळे, दक्षिण सोलापूर : शिवदारे भारती राजशेखर आणि महिला मतदारसंघ : अस्मिता गायकवाड, रोहिणी तडवळकर, इतर मागासवर्ग मतदारसंघ : अजिंक्यराणा पाटील, सिध्दाराम म्हेत्रे. नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था मतदारसंघ : मनीष देशमुख, आमदार सुभाष देशमुख, प्रकाश पाटील, शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहाजी पवार. तर आज
मोहिते-पाटील, परिचारक
गटाचे अर्ज येतील. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे, जि. प.पक्षनेत्या रश्मी बागल, माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचेही अर्ज आज दाखल होणार आहेत. कोण कुणाचे याचा किमान अंदाज आज येईल.
What's Your Reaction?