टीईटी पेपरफुटीचे सोलापुरी कनेक्शन, पोलीस प्रशिक्षक प्रकाश पवारला ठोकल्या बेड्या

TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास सोलापुरापर्यंत पोहोचला असून भिवंडी पोलिसांनी भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण संस्था चालक प्रकाश पवार याला अटक केली आहे. विद्यार्थ्यांची कागदपत्रे आरोपींना दिल्याचे तपासात समोर आले असून, या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

Aug 11, 2026 - 22:40
Aug 12, 2026 - 23:46
 0  262
टीईटी पेपरफुटीचे सोलापुरी कनेक्शन, पोलीस प्रशिक्षक प्रकाश पवारला ठोकल्या बेड्या

सोलापूर :   "नीट" पाठोपाठ टीईटी  पेपर फुटी प्रकरण अजूनही गाजत असून आता यामध्ये सोलापुरी कनेक्शन समोर आल्यामुळे  खळबळ उडाली आहे. सोमवारी भिवंडी पोलिसांनी सोलापूरमधील भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण संस्था चालक प्रकाश पवारला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान टीईटी पेपर लिकमध्ये  आतापर्यंत १६ जणांना ताब्यात घेतले आहे. 
   भिवंडी येथे टीईटी परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्यानंतर महाराष्ट्रात ही परीक्षाच रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास भिवंडी पोलिसांच्या विशेष पोलीस तपास पथकाकडून सुरु असतानाच त्यांना सोलापुरी कनेक्शनची कुणकुण लागली. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या घटनेचा मुख्य सुत्रधार विजेंद्र गुप्ता याला अटक केली आहे. प्रारंभी पोलिसांनी दिल्ली, आग्रा, बिहार येथून  काही संशयितांना अटक केली होती. 
   या तपासात पेपर फुटीचे धागेदोरे महाराष्ट्रातही असल्याची खबर लागली. तेव्हा पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला, आता याचे धागेदोरे सोलापूरपर्यंत पोहोचले असल्याचे तपासणीअंती उघड झाले आहे. 
   पवार याची सोलापूर येथे पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणारी संस्था असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे. यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना पवार याने काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कागदपत्रे नेमकी कोणत्या उद्देशाने देण्यात आली होती. तसेच या प्रकरणातील अन्य व्यक्तींशी त्याचा संबंध आहे का, याचा अधिक छडा पोलिसांकडून करण्यात येत आहे. 
   दरम्यान, टीईटी पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी आतापर्यंत १६जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांची कागदपत्रे आणि परीक्षेतील गैरप्रकाराशी संबंधित इतर बाबींचा तपास सुरू असल्याचे भिवंडी पोलिसांनी सोलापुरात सांगितले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow