आ.कल्याणशेट्टी यांच्या हत्येचा कट;वाहनचालकाला पैशाचे आमिष
संशयित म्हणाले, दादांना गोळ्या घाल, आम्ही तुला मोठी रक्कम देतो, दोघांवर गुन्हा दाखल, संतापजनक निंदनीय प्रकाराने राजकीय क्षेत्रात खळबळ
(विजयकुमार पिसे)
सोलापूर : अक्कलकोटचे लोकप्रिय भाजपा आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या कथित हत्येच्या कटामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून दोघा संशयितांनी वाहनचालकाला आमिष देताना सांगितले की, तू गोळ्या घाल, आम्ही तुला मोठी रक्कम देतो. या प्रकरणी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी दुपारी आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबिय खरेदीसाठी सोलापुरातील होटगी रोडवरील महावीर चौक भागात आले होते. तेव्हा वाहनचालकाजवळ येऊन दोघा संशयितांनी सांगितले की, तू दादांना गोळ्या घाल, आम्ही मोठी रक्कम देतो आणि पुढचे बघून घेतो. तेव्हा वाहनचालक आनंद सुरवसे हे घाबरून गेले. त्यांनी थेट सदर बझार पोलीस ठाणे गाठले आणि संशयितांविरोधात फिर्याद दिली.
शश्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी अशी दोघा संंशयितांची नावे असल्याचे समोर आले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात ही वार्ता पसरताच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. संशयितांनी वाहनचालक सुरवसे यांना सांगण्याचा प्रयत्न केला की, तुला आम्ही भरपूर पैसे देतो, तू तुझ्या आमदार दादाला गोळ्या घालून मारून टाक. यातून तुझा मोठा फायदा आहे आणि पुढचं काय ते आम्ही बघून घेऊ. या ऑफरला चालक आनंद सुरवसे यांनी नकार देत संशयितांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने संशयितांनी तिथून पोबारा केला.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून वाहन चालक आनंद सुरवसे यांनी तात्काळ सदर बाजार पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेल्या घटनेची हकीकत सांगितली. तसेच पोलिसांत फिर्याद नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सत्ताधारी भाजपा आमदारांच्या सुरक्षेशी आणि हत्येच्या कटाशी संबंधित हा प्रकार असल्याने पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. त्यांनी तात्काळ तपास हाती घेतला आहे.
What's Your Reaction?