म्हेत्रेे आणि शिंदे परिवाराच्या प्रॉपर्टीचा ताबा;*पंजाब बँकेची कारवाई
मातोश्री लक्ष्मी शुगरकडे 75 कोटी थकबाकी, सहकार आणि राजकीय क्षेत्रात खळबळ, ऊस बिलासाठी शेतकरी आंदोलनाने वेधले होते लक्ष

(विजयकुमार पिसे)
अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे आणि राष्ट्रवादीचे दत्ता शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मी शुगरकडे पंजाब नॅशनल बँकेची 75 कोटी 69 लाख रुपयांची थकबाकी असून यापोटी बँकेने म्हेत्रे आणि शिंदे परिवार यांच्या अक्कलकोट आणि सोलापूर येथील प्रापर्टीचा प्रतीकात्मक ताबा घेतला, असे नोटिशीद्वारे नमूद केले आहे.
कर्जदार आणि जनतेने सदर प्रॉपर्टीचा कोणताही व्यवहार करू नये असेही आवाहन केले आहे. म्हेत्रे यांनी, शेतकरी उस बिलाच्या थकीत रक्कम अदा न केल्यामुळे उस पुरवठा करणार्या शेतकर्यांनी गत वर्षभरापासून काँग्रेस भवन आणि म्हेत्रे यांच्या निवासासमोर आंदोलन करून लक्ष वेधले होते. विरोधक़ांचा हा राजकीय कावा आहे, असे स्पष्टीकरण म्हेत्रे करायचे. पण आता पीएनबी बँकेनेच कारवाई केल्यामुळे वस्तुस्थिती समोर आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील रूद्देवाडी येथे म्हेत्रे यांच्या मातोश्रींच्या नावाने मे. मातोश्री लक्ष्मी शुगर कारखाना कार्यरत असून माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे अध्यक्ष, गोकुळ शिंदे उपाध्यक्ष, दत्ता शिंदे व्यवस्थापकीय संचालक, शिवराज म्हेत्रे संचालक, मयत सातलिंगप्पा म्हेत्रे संचालक आहेत. याशिवाय शिंदे परिवारातील गणपत द. शिंदे, बलभीम द.शिंदे, कुसुम ग. शिंदे, शोभा ब.शिंदे, कपिल ब.शिंदे हे जामीनदार/गहाणदार आहेत. या सर्वांवर पीएनबी बँकेने 26 ऑगस्ट 2024 रोजी नोटीस बजावली होती.
सदर नोटिशीद्वारे तेव्हा येणे रक्कम 72 कोटी 16 लाख रुपये 1 मार्च 2024 रोजी व्याजासह 60 दिवसांचे आत परत करावी असे नमूद केले होते. मात्र कर्जदार म्हेत्रे आणि शिंदे परिवार हे सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने पीएनबी बँकेने सब सेक्शन (4) सेक्शन 13 आणि रूल 8 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून 30 डिसेंबर 2024 रोजी प्रॉपर्टीचा प्रतीकात्मक ताबा घेतला आहे. सध्या बँकेकडे 75 कोटी 69 लाख 18 हजार पन्नास रुपये आणि 27 पैसे येणे असल्याचे कारवाई नोटिशीत नमूद केले आहे. पीएनबी बँकेने सुरक्षित मालमत्तेचा तपशील नमूद केला असून यामध्ये मातोश्री लक्ष्मी शुगर व जमीन तसेच सिध्दाराम म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे यांची अक्कलकोट तालुक्यातील मालमत्ता आणि शिंदे यांची सोलापुरातील मालमत्ता यांचा उल्लेख केला आहे. पीएनबी ब़ँकेने दि सिक्युरिटायझेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेटस अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी अंतर्गत 30 डिसेंबर 2024 रोजी ताबा नोटीस दिली आहे.
What's Your Reaction?






