अखेर माधुरी हत्तीची नांदणी मठात घरवापसी; कोल्हापुरात दिवाळीसारखा उत्साह

१३ महिन्यांनंतर ‘महादेवी’ पुन्हा मायभूमीत; फुलांची उधळण, रांगोळ्या आणि नागरिकांचा जल्लोष

Sep 12, 2026 - 18:32
 0  15
अखेर माधुरी हत्तीची नांदणी मठात घरवापसी; कोल्हापुरात दिवाळीसारखा उत्साह

कोल्हापूर : गेल्या १३ महिन्यांपासून गुजरातमधील जामनगर येथील वनतारामध्ये असलेली माधुरी हत्ती अखेर कोल्हापुरात परतली आहे. शिरोळ तालुक्यातील नांदणी मठात माधुरीचे आगमन होताच परिसरात दिवाळीसारखा उत्साह पाहायला मिळाला. नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत तिचे जल्लोषात स्वागत केले. माधुरीवर फुलांची उधळण करण्यात आली, तर तिच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या.

माधुरीला कोल्हापुरात परत आणण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीने (HPC) ९ सप्टेंबर रोजी घेतला होता. न्यायालयीन प्रक्रिया आणि उच्चाधिकार समितीच्या निर्देशांनंतर तिची नांदणी मठात घरवापसी झाली. वनताराचे सीईओ विवान कर्णिक आणि त्यांची टीम माधुरीला घेऊन नांदणी येथे पोहोचली.

माधुरीच्या स्वागतासाठी नांदणी मठ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारासही परिसरात उत्साहाचे वातावरण होते. माधुरी कोल्हापुरात परतल्याच्या आनंदात नागरिकांनी जल्लोष केला. अनंत अंबानी यांचे आभार मानणारे बॅनरही यावेळी लावण्यात आले होते.

१३ महिन्यांपूर्वी वनताराला नेले होते

माधुरीला ३० जुलै २०२५ रोजी उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार जामनगर येथील वनतारा येथे नेण्यात आले होते. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचीही मान्यता होती. माधुरीचा ताबा मिळावा अशी मागणी वनताराने केली नव्हती, तर न्यायालयीन निर्देशानुसार तिची जबाबदारी स्वीकारून तिच्यावर उपचार आणि देखभाल करण्यात आली, असे वनताराकडून स्पष्ट करण्यात आले होते.

माधुरीचे कोल्हापुराशी असलेले भावनिक नाते आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन वनताराने सक्षम प्राधिकरणांच्या निर्णयाचा आदर करण्याची भूमिका घेतली होती.

उच्चाधिकार समितीच्या अटी काय?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर माधुरीबाबतचे दावे उच्चाधिकार समितीसमोर मांडण्यात आले. समितीने संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच विविध अहवाल मागवून नांदणी येथील सुविधेची पाहणी केली. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी माधुरीला काही अटींसह कोल्हापुरात परतण्याची परवानगी देण्यात आली.

माधुरीचा मिरवणुका किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी वापर करता येणार नाही. तिला चोवीस तास योग्य देखभाल देणे बंधनकारक असून, दर १५ दिवसांनी तिची वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे.

वनताराकडून उपचार आणि वैद्यकीय मदत सुरूच

वनताराच्या म्हणण्यानुसार, सातत्यपूर्ण पशुवैद्यकीय उपचारांमुळे माधुरीची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, तिच्या दीर्घकालीन आरोग्याच्या काही समस्या अद्याप कायम असल्याने नियमित उपचार आणि पशुवैद्यकीय देखरेखीची आवश्यकता आहे. माधुरी नांदणी मठात परतल्यानंतरही तिच्या आरोग्यासाठी वनतारा आवश्यक वैद्यकीय मदत देणार आहे. योग्य निवास व्यवस्था, पशुवैद्यकीय सुविधा, वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी वनताराने मदत केली आहे. विशेष म्हणजे, वनताराचे पशुवैद्यकीय डॉक्टर दर १५ दिवसांनी कोल्हापुरात येऊन माधुरीची तपासणी करणार असून, तपासणीचे अहवाल सक्षम प्राधिकरणांना सादर केले जाणार आहेत.

‘महादेवी’च्या घरवापसीने भावुक झाले कोल्हापूरकर

माधुरीला वनताराला घेऊन जात असताना कोल्हापुरात नागरिकांनी मोठा विरोध केला होता. तिच्याशी असलेल्या भावनिक नात्यामुळे माधुरीला निरोप देताना अनेक नागरिक भावुक झाले होते. त्यामुळे तब्बल १३ महिन्यांनंतर तिची नांदणी मठात झालेली घरवापसी कोल्हापुरकरांसाठी भावनिक क्षण ठरली आहे. माधुरीच्या आरोग्याची, कल्याणाची आणि सन्मानाची काळजी घेणे हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे वनताराने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, उच्चाधिकार समिती तसेच महाराष्ट्र आणि गुजरात सरकारचे वनताराने आभार मानले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow