८१३ "बी-2" मिळकती फ्री-होल्ड होणार, मनपा सभेत आ.कोठेंचे अभिनंदन
मिळकतींवरील शर्तभंगही नियमानुकूल करण्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांचे जिल्हाधिकार्यांना आदेश, मनपा सभेत आ. देवेंद्र कोठे यांचे विशेष अभिनंदन तसेच विक्रमी १७०विषयांना मंजुरी दिल्याबद्दल महापौर कोंड्याल, सभागृहनेते काळे यांचाही सत्कार
मुंबई,: सोलापूर नगर भूमापन हद्दीतील "बी-2" सत्ताप्रकार असलेल्या एकूण ८१३ भोगवटादार वर्ग-2 च्या मिळकतींना सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारून फ्री-होल्ड (भोगवटादार वर्ग-1) करण्याचा महत्त्वपूर्ण राज्य शासनाने घेतला आहे. तसेच या मिळकतींवरील झालेले शर्तभंगही नियमानुकूल करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
पावसाळी अधिवेशनातील मंजुरीनंतर महसूल विभागाने या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय आज ( दि. 20 जुलै) रोजी प्रसिद्ध केला आहे. दरम्यान आज मनपा सभेत आ. देवेंद्र कोठे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच विक्रमी १७० विषयांना मंजुरी दिल्याबद्दल महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांचा नगरसेवकांनी सत्कार केला.
सोलापूर शहरातील एकूण ३००७७ मिळकतींपैकी ८१३ मिळकतींच्या मिळकत पत्रिकेवर ʼबी-2ʼ असा सत्ताप्रकार नमूद आहे. यामध्ये लिलावाद्वारे विकलेल्या ५४९ मिळकती आणि टी.पी. ३ योजनेमधील २६४ मिळकतींचा समावेश आहे. या जमिनींवर सध्या प्रामुख्याने गिरणी/मिल कामगारांची वहिवाट असून, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असलेल्या या नागरिकांना वर्ग-2 च्या स्वरूपामुळे पुनर्विकासात मोठ्या अडचणी येत होत्या. नागरिकांची ही समस्या लक्षात घेता, शासनाने एक विशेष बाब म्हणून १९८९ च्या रेडी रेकनरच्या वार्षिक मूल्यदर तक्त्यानुसार सवलतीचे अधिमूल्य आकारून या जमिनी फ्री-होल्ड करण्यास मान्यता दिली आहे.
त्यानुसार निवासी प्रयोजनासाठी २.५ टक्के अधिमूल्य तर वाणिज्यिक प्रयोजनासाठी ५.०% अधिमूल्य आकारले जाणार आहे. सदर सवलतीच्या दराने शर्तभंग नियमानुकूल करून या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, सोलापूर यांना देण्यात आले आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे सोलापुरातील शेकडो कामगार कुटुंबांना आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या हक्काच्या घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान आज सोमवारी मनपाची सभा पार पडली. यावेळी बी 2 बद्दल आ.देवेंद्र कोठे यांचे विशेष अभिनंदन मनपा सभेत करण्यात आले. तसेच विक्रमी १७० विषयांना मंजुरी दिल्याबद्दल महापौर कोंड्याल आणि सभागृह नेते यांचा मनपा सभेनंतर उपस्थित भाजपा नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला. यानंतर सायंकाळी आ.कोठे यांच्या संपर्क कार्यालयात आ. देवेंद्र कोठे यांनी महापौऱ कोंड्याल यांचा विशेष सत्कार केला.
What's Your Reaction?