दुर्गा वाहिनीकडून माऊली पालखीची सेवा आणि स्वागत

विहिंपची आरोग्य वारी नातेपुतेत दाखल, मुक्कामाच्या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

Jul 21, 2026 - 00:01
 0  147
दुर्गा वाहिनीकडून माऊली पालखीची सेवा आणि स्वागत

(विजयकुमार पिसे) 
  सोलापूर |  आषाढी वारीनिमित्त आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा नातेपुते येथे आल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी तळ ठोकला, तेव्हा वरुण राजानेही वारकर्‍यांना चिंब भिजवलं. तरीही वारकर्‍यांचा टाळ मृदंगाचा गजर सुरू होता. यावेळी विश्‍व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानोबा पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच पुण्याहून निघालेल्या आरोग्य वारीच्या माध्यमातून वारकर्‍यांची सेवा दुर्गा वाहिनी आणि विहिंप कार्यकर्त्यांनी केली. 


    सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत झाल्यानंतर  मोरोची येथे दुपारचा विसावा पार पडला. विहिंपची आरोग्यवारी मोरोची येथून नातेपुते येथे दाखल झाली. या निमित्ताने नातेपुते येथे दुर्गावाहिनीच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. दुर्गा वाहिनीच्या विभाग प्रमुख सौ. प्रगती सतीश नाकुरे यांच्यासह दुर्गा कु.उन्नती युवराज माने देशमुख (पंढरपूर जिल्हा संयोजिका), दुर्गा कु.युविका कदम (अकलूज प्रखंड संयोजिका) तसेच दुर्गा  कु.सानिका देवल (नातेपुते खंड संयोजिका) उपस्थित होत्या. तसेच डॉ. शर्वरी यरगट्टीकर (पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत सेवा विभाग सहप्रमुख) मातृशक्ती सौ. अनिता पडवळ (पिंपरी जिल्हा) यांनीही स्वागत कार्यक्रमात सहभाग घेतला. 
   याप्रसंगी विहिंपचे विभाग मंत्री श्री. विजयकुमार  पिसे, अकलूजचे श्री. शिवाजीराव घोडके (पंढरपूर जिल्हा सहमंत्री) यांनी उपस्थित राहून दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना सेवा, संघटन व कार्यविस्तार याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पालखी  सेवा कार्यात त्यांनी सहभाग घेतला.  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गावरील आरोग्यवारीचे पथक प्रमुख श्री. पुजारी काका यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर, नर्सेस, अ‍ॅम्बुलन्स चालक तसेच विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असे 13 जणांचे पथक या सेवा कार्यात सक्रिय आहेत.
   नातेपुतेचा मुक्काम संपवून माऊलींचा पालखी सोहळा माळशिरसमध्ये दाखल झाला. आता वारकर्‍यांना  पंढरीची ओढ लागली असून प्रवाही वारकरी माळशिरस, अकलूज,श्रीपूर,वेळापूर, तोंडले बोंडल्याकडे मार्गस्थ होत आहेत. काल पालखी मार्गावर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वारी मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहतूक कोंडी झाली होती. पावसाच्या सरींनी वारीचा मार्ग भिजविला, तरीही वारकर्‍यांची भक्ती आणि सेवेचा संकल्प अधिकच दृढ झाला.
  विहिंप आरोग्यवारीच्या पथकाने उत्कृष्ट समन्वय राखत नातेपुते येथे  आपली सेवा रुजू केली. नातेपुते येथे प्रथमच दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून सेवा, सुरक्षा आणि संस्काराचे कार्य प्रभावीपणे सुरू झाले आहे. पालखी सोहळ्यात वारकरी सेवेचे समाधान दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना लाभले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow