कर्नाटकात शेतीस ८तास, महाराष्ट्रात मात्र फक्त २तास वीज
आ.सुभाषबापूंचा विधीमंडळात दक्षिण सोलापूरसाठी आवाज, महाराष्ट्रातील शेतकर्यांनाही अखंड व नियमित वीजपुरवठा द्या!
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात शेतीसाठी वीज पुरवठ्याबाबत आ.सुभाष देशमुख यांनी दुसर्यांदा आवाज उठवला. कर्नाटकात शेतीस अखंड आठ तास वीज, महाराष्ट्रात मात्र फक्त दोन तास वीज असा उफराटा न्याय असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. दक्षिण सोलापूरच्या शेतकर्यांनाही अखंड व नियमित वीजपुरवठा द्या, अशी मागणी आ.सुभाषबापूंनी यावेळी केली.
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकर्यांनाही अखंड, पुरेसा व नियमित वीजपुरवठा मिळावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यासंदर्भात यापूर्वी सभागृहात हाच प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधल्याचे ते म्हणाले. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या जलसाठ्यावर दोन्ही राज्यांतील शेती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या नदीवरील जलस्रोतावर दोन्ही राज्यांतील शेती अवलंबून असतानाही कर्नाटकातील शेतकर्यांना सिंचनासाठी आठ तास, तर महाराष्ट्रातील शेतकर्यांना केवळ दोन तास वीजपुरवठा मिळतो. ही तफावत महाराष्ट्रातील शेतकर्यांवर अन्याय करणारी असून, अपुर्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. परिणामी उत्पादनात घट होऊन शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तसेच मंद्रूप व परिसरातील आठ गावांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकने भीमा नदीवर सुमारे सहा मीटर उंचीचे बंधारे उभारल्यामुळे पाणी तेथे अडते, तर महाराष्ट्रातील केवळ चार मीटर उंचीचे बंधारे अपुरे ठरत असल्याने पाणी पुढे वाहून जाते आणि अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकर्यांनाही पुरेसा व नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. तसेच, मंद्रूप व परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना व बंधार्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी शासनाकडे आग्रहाची मागणी केली.
महावितरणची 'स्मार्ट' सक्ती नको, स्थगिती द्या : आ. देवेंद्र कोठे
What's Your Reaction?