नगरसेवक,जि.प.सदस्यांना घबाडयोग! '५'ही बोटे तुपात
'लक्ष'लक्ष' "लक्ष्मी दर्शना"मुळे सर्वांच्या 'मनी' वसंत फुलला! विधान परिषदेसाठी आज निर्णायकी,पसंतीचे मत भाजपाच्या राऊतांना, २२ जूनला किती मतांच्या फरकाने जिंकणार यासाठी आज सायंकाळनंतर पैजा
(विजयकुमार पिसे)
जानेवारीत महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी नगरसेवक\उमेदवारांना घबाडयोग लाभला, त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या अंतराने पुन्हा हा योग जुळून आला असून शिवाय आज 'गुरुपुष्यामृत'. असा हा 'दुग्धशर्करा' योग. आयती आलेली संधी कोण, कशी दवडणार? महापालिकेच्या ८ स्वीकृत नगरसेवकांपासून ग्रामीण भागातील जि.प.सदस्यांची *पाच*ही बोटे तुपात गेली आहेत. "लक्षलक्ष लक्ष्मीदर्शना"मुळे अनेक नगरसेवक, जि.प.सदस्यांच्या "मनी" (Money) वसंत फुलला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपाचे राजेंद्र राऊत आणि शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख यांच्यात आज निर्णायकी आहे. सर्वाधिक पसंतीची मते राऊतांना मिळणारच आहेत. मात्र वसंत देशमुख किती मते मिळवणार याचीही उत्सुकता आहे. येत्या २२ जूनला मतपेटी फुटेल. पण आज सायंकाळपासूनच यासाठी पैजा लागतील.
सोलापूर जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायत, पंचायत समितीचे सभापती, जि.प.सदस्य आणि सोलापूर महापालिकेतील ८ स्वीकृत तसेच १०१ नगरसेवक अशा ६१५ मतदारांचा कौल या दोन उमेदवारांना मिळणार आहे. हे सर्व मतदार इतके नशीबवान आहेत की, त्यांना जानेवारीनंतर पुन्हा एकदा लक्ष लक्ष लक्ष्मीदर्शन घडत आहे. विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर "घबाडयोग" "लक्ष्मी दर्शना" पासून सगळेच वंचित राहिले असते. शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांची उमेदवारी खा.धैर्यशील मोहिते पाटलांनी ठेवली, त्याचा हा लाभयोग होय.
जिल्ह्यात सहा ठिकाणी मतदान केंद्रात बॅलेट पेपरने मतदान होईल. यासंदर्भात महायुतीच्या नगरसेवकांनी मतदान कसे करायचे याविषयी त्यांचा वर्कशॉप बुधवारी सायंकाळी पार पडला. अनेक नवागत नगरसेवक या उत्सवी योगामुळे हरखून गेले होते. अवघ्या सहा महिन्यांच्या अंतराने लक्ष्मी दर्शनाचा घबाडयोग येतो, याचा मनस्वी आनंद त्यांच्या चेहर्यांवर ओसंडून वाहत होता.
*८ नगरसेवकांनी नाकारले लक्ष्मीदर्शन*
एकीकडे घबाडयोगाची उत्सुकता असतानाच काही स्वाभिमान्यांनी हा योग स्वीकारण्यास सविनय नकार दिल्याचे कळते. ही संख्या आठपर्यंत असून यापैकी बहुतांश शहर उत्तर आणि एक शहर मध्य मतदारसंघामधील नगरसेवक मतदार असल्याचे समजते. पाचही बोटे तुपात असा "लक्ष लक्ष्मी दर्शना"चा योग जुळून आल्यानंतर देखील काहींच्या "कारभार्यां"नी "आकडे"मोडले अशीही चर्चा आहे. शिवाय काही जणांनी नाराजी जाहीर केली. हा प्रकार पाहून संबंधित उमेदवार देखील आश्चर्यचकीत झाले, अशी कुजबूज आहे.
What's Your Reaction?