काँग्रेसमुक्त सोलापूर जिल्हा; भोपळा देखील नाही फोडला

बार्शीत फक्त राजाभाऊ! महायुती,मविआ, तरीही शत प्रतिशत कमळ, दक्षिण व अक्कलकोटमध्ये सेनेने खाते उघडले

Feb 10, 2026 - 01:17
 0  136
काँग्रेसमुक्त सोलापूर जिल्हा; भोपळा देखील नाही फोडला

(विजयकुमार पिसे)

काँग्रेसमुक्त सोलापूर जिल्हा झाला असून, जि.प. आणि पं.स.निवडणुकीत सुफडा साफ झाला आहे. त्यांना भोपळा देखील फोडता आलेला नाही. संविधान आणि उपरा उमेदवारचा नॅरेटिव्ह करून लोकसभा जिंकलेल्या काँग्रेसला विधानसभापाठोपाठ सर्वच निवडणुकांमध्ये दारुण अपयश आले आहे. बार्शीमध्ये भाजपाविरोधात महायुती व मविआने दम आणला,पण देवाभाऊच्या खमक्या पठ्ट्याने राजेंद्र राऊतांनी शत प्रतिशत कमळ फुलवले आहे. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये शिवसेनेने खाते उघडले आहे. माढा पं.सं. अजितदादा तर सांगोल्यात शेकापने तारले आहे.

    लोकसभा निवडणुकीत प्रणितीताईंना मोहोळ,मंगळवेढा आणि पंढरपूरकरांनी हात देऊन दिल्लीत पाठवले. त्यानंतर तार्ईंचा शहर मध्य मतदारसंघ भाजपाने हिसकावून घेतला. आता जि.प.आणि पं.स.निवडणुकीतही काँग्रेस भुईसपाट झाली आहे. बार्शीत सहा जि.प. आणि 12 पं.स.मध्ये शत प्रतिशत कमळ फुलले आहे. राजेंद्र राऊत विरोधात आ.दिलीप सोपल यांनी दोन सेना आणि दोन राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा *पंच मारण्याचा प्रयत्न केला, पण *सोपलांनाच जोरदार पंच बसला. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सभा देखील घेतली. तरीही बार्शीत विरोधक बेवारशी ठरले आहेत.

    दक्षिण सोलापूरमध्ये सहापैकी5 भाजपा 1 शिवसेना आणि 12 पं.स.पैकी11 भाजपा आणि एक सेना असे बलाबल झाले आहे. दक्षिणेत आ.सुभाषबापू विरोधात सर्व पक्ष एकत्र आले होते, पण सेनेला केवळ खाते उघडता आले.अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अव्हान दिले होते. त्यांचे दोन्ही वारस जिंकले, तसेच तानवडेंचे वारस प्रवीण तानवडे शिरवळ गटातून जि.प.वर गेले, पं.स.मध्ये गणेश मोरे यांनी बाजी मारली. शिवराज म्हेत्रे सलगर जि.प. तोळणूर पं.स.गणातून शीतल म्हेत्रे या बहीण भावांनी यश संपादन केले. 

   आ. कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी या चपळगाव गटात तर भाऊ सागर गणातून विजयी झाले आहेत. माळशिरस दहीगाव जि.प. गटात संस्कृती राम सातपुते यांनी आ.जानकरांचे सुपुत्र जीवन यांना चीतपट केले. सांगोलेत शहाजीबापूंच्या सुनबाई जिंकल्या. उत्तर सोलापुरात दिलीप माने यांचे सुपुत्र पृथ्वीराज माने जिंकले. त्यांनी काँग्रेस तालुकाध्यक्ष भारत जाधव यांचा पराजय केला. याशिवाय माजी जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ यांचे बंधू भाजयुमोे माजी अध्यक्ष इंद्रजित पवार जिंकले. खा.धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू अर्जुनसिंग मोहिते पाटील गुरसाळेमधून पराभूत तर माळशिरस गणातून जिंकले आहेत. बूथवर आपल्या मुलाकडून इव्हीएम बटन दाबल्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow