जि.प.,पं.स.चा आज फैसला मतदानात अनेक ठिकाणी राडे, महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेने?

जादूटोणा,भानामती,हाणामारी,बूथवर चमत्कृती,चक्क धाब्यावर इव्हीएम मशीन

Feb 9, 2026 - 00:01
 0  182
जि.प.,पं.स.चा आज फैसला मतदानात अनेक ठिकाणी राडे, महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेने?

(विजयकुमार पिसे)

पुरोगामी,सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आम्ही अभिमानाने मिरवतो, आणि नेहमीच बिहारला दूषणे देतो. पण राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रच आता बिहारच्या दिशेने वाटचाल करीत आहे का? राज्यातील 12 जि. प. आणि 125 पं. स.साठी मतदान झाले. सोमवारी मतमोजणीनंतर फैसला आहे. मात्र काल सायंकाळी मतदान संपल्यानंतर ज्या वार्ता समोर आल्या. त्या धक्कादायकच. अनेक ठिकाणी राडे झाले. इव्हीएम मशीन चक्क धाब्यावर आढळले. मतदान केंद्रात इव्हीएमच्या शेजारी लिंबू मिरची जादूटोणा,भानामतीचे प्रकार आढळले. काही उमेदवारांनी चक्क इव्हीएमची पूजा केली,नारळ वाढला. तर काही ठिकाणी लहान मुलांच्या बोटाला शाई लागली. हे सर्व निवडणूक प्रशासन अधिकारी,कर्मचारी यांच्या साक्षीने झाले. त्यामुळे निवडणूक यंत्रणा राज्यकर्त्यांची *बटीक झाली की काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. विशेष म्हणजे आता राज्यात *काँग्रेस विचाराची सत्ता *हद्दपार झाली आहे. 

  सोलापूरसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या 731, तर आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडली. 7 हजार 438 उमेदवारांच्या नशीब फैसला सोमवारी कळणार आहे. सोलापूरपासून 7 कि.मी.अंतरवरील मुळेगाव तांडा येथे ईव्हीएम खाली टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची आढळली. जादूटोण्याच्या या प्रकारामुळे मतदारांमध्ये भीती पसरली. शिवाय एक महिला हा प्रकार पाहून जागेवरच कोसळली. टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची ठेवून जादूटोणा केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल देखील झाले आहेत. या प्रक़ारानंतर अपक्ष उमेदवार संदीप राठोड तिथे धावून आले.

   अक्कलकोट मतदारसंघातील दक्षिण सोलापूर तालुक्यामधील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू असताना एक महिला मतदार मतदान करण्यासाठी केंद्रात गेली. मतदान करून बाहेर येत असतानाच त्या महिलेला अचानक चक्कर आली आणि ती जागीच कोसळली. शुद्धीवर आल्यानंतर त्या महिलेने ईव्हीएम मशीनच्या खाली लिंबू-मिरची आणि जादूटोण्याचे साहित्य पाहिल्याचे सांगितले.

   अकलूज शहरातील भाजप कार्यकर्त्यांना 100 मीटरच्या बाहेर काढा, या शब्दात खा. मोहिते पाटलांनी पोलिसांना सुनावले. भाजपाचे अकलूज शहरातील कार्यकर्ते मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत येऊन दहशत माजवत आहेत असा आरोप खा. धैर्यशील मोहिते पाटलांनी केला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत त्यांनी पोलिसांना खडसावले. अकलूजच्या यशवंत नगर मतदान केंद्रावर वडिलांसोबत आलेल्या लहान मुलानेही मतदान केले. जि.प. उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील आपल्या लहान मुलाला घेऊन मतदान केंद्रावर आले. रुद्रराज या लहान मुलाने मतदान केल्याचा संशय आहे. आईला आणि वडिलांना मतदान करताना बघायचे म्हणून मुलाला आणले असा खुलासा अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी केला आहे. सोलापूर व छ.संभाजीनगर जिल्ह्यात बूथवर असे *पोरखेळ प्रकार झाले. विशेष म्हणजे तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांनी चक्क या पोरखेळ कौतुक वाटले. असे चमत्कृतीजन्य प्रकार *बिहार मध्ये होत असत. आता *सुसंस्कृत महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत.

   करकंब येथे आ.अभिजीत पाटलांचे बंधू अमर पाटील व भाजप उमेदवार आदिनाथ देशमुख यांच्यात खडाजंगी झाली. तर मतदानाच्या दिवशीच खेडमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या नेत्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्याचा प्रक़ार खेड येथे घडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे पती आणि माजी जि.प. सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. 

    आ.विलास भुमरे आपल्या मुलाला घेऊन मतदानकेंद्रात आले. विशेष म्हणजे अधिकार्‍यांनीही लहान मुलाच्या बोटाला शाई लावली. आ. विलास भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आपल्या मुलाच्या बोटावरही शाई लावायला सांगितली. तिथल्या निवडणूक कर्मचार्‍यांनीही मुलाच्या बोटाला शाई लावली आहे. 

    राडे,पळवापळवी, नेत्यांचे कुटुंबकरण आणि त्यातून एकमेकांवर ह्ल्ले, पाहता राज्यातील पोलीस व प्रशासन सोयीस्कर भूमिका पार पाडतात, असाच त्याचा अर्थ काढला गेला तर आश्‍चर्य वाटू नये. त्यामुळे बिहाराच्या दिशेने वाटचाल करणार्‍या महाराष्ट्रात असे प्रकार भविष्यात वाढले तर आश्‍चर्य वाटू नये. शेवटी प्रश्‍न उपस्थित होतो, निवडणूक आयोग काही कारवाई करणार का?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow