संतापजनक! सोलापूर विद्यापीठाचा पुरुषी अजेंडा, स्त्री शक्तीला धोंडा!

पुरस्कार सन्मानात एकही ना कर्तृत्ववान अहिल्याबाई, ना सावित्रीची लेक

Jul 30, 2026 - 03:14
 0  1
संतापजनक! सोलापूर विद्यापीठाचा पुरुषी अजेंडा, स्त्री शक्तीला धोंडा!

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : केवळ एका जिल्ह्यासाठी म्हणून मानांकित पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापनानिमित्त पुरस्कारांचे वितरण होत असून या मानकर्‍यांमध्ये एकही कर्तृत्ववान अहिल्याबाई नाही. ना एकही सावित्रीची लेक. पुरस्काराचे सर्वच पुरुषसत्ताक मानकरी आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या नावात अहिल्याबाई होळकरांचे नाव, पण पुरस्कार निवड समितीला कर्तबगार  महिला अधिक़ारी, प्राचार्या,प्राध्यापिका, शिक्षिका  कर्मचारी आढळले नाहीत का? हे आश्‍चर्यजनकच नव्हे तर निंदनीय आणि संतापजनक आहे. अर्थात विद्यापीठाचा हा पुरुषी अजेंडा असावा.
   विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू  प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. संशोधक साहित्यिक गोपाळ देशमुख यांना विद्यापीठ जीवनगौरव, तर वालचंद महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय व  डॉ. सत्यजित शहा उत्कृष्ट प्राचार्य म्हणून घोषित केले आहे. देशमुख  ऐतिहासिक संशोधक आणि साहित्यिक असून  ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व गौरवपत्राने त्यांना सन्मानित केले जाईल. मुंबईचे पद्मश्री डॉ. गणपती यादव आणि पुण्याचे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
    वालचंद  कॉलेज उत्कृष्ट महाविद्यालय, डॉ. शहा उत्कृष्ट प्राचार्य तसेच विद्यापीठातील डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. बापू राऊत यांचा उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट शिक्षकेतर अधिकारी नसीर देशमुख, शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानेश्‍वर निंबाळकर,  शिवराज मिटकरी (शिपाई), लिपिक अशोक कोरे आणि विष्णू वाघमारे हे अन्य कर्मचारी पुरस्काराचे मानकरी जाहीर केले आहेत. या सर्व पुरस्कारांमध्ये जिल्हाभरातून एकही कर्तृत्ववान कर्तबगार प्राध्यापिका,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वा अन्य कुणी महिला सापडल्या नाहीत का? सावित्रीची लेक कुठे मिळाली नाही का? विद्यापीठाच्या नावात अहिल्याबाई असून देखील हे विद्यापीठ पुरुषसत्ताक मानसिकतेची स्वकर्तबगारी मिरवते असे दिसून येते. निवड समिती, माहिती घेणारे आणि देणारे मंडळी चायबिस्कुट ग्रुप आहेत की काय? त्यांनाही स्त्री शक्तीच्या न्यायाचा प्रश्‍न उपस्थित झाला नाही, वा केला नाही का? असा सवाल उपस्थित होतो.
  विशेष म्हणजे ५७ पैक़ी ४० मुली सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत,त्या स्वकर्तृत्वामुळे. हा स्त्री शक्तीचा गौरव व अभिमान. परंतु पुरस्कारासाठी निवड करणारी समिती पुरुषसत्ताक असावी. सोलापुरात केवळ महिला व मुलींसाठी चालवली जाणारी महाविद्यालये देखील आहेत. त्यांची तरी किमान दखल घ्यावी; करवंटेपणा म्हणतात ते हेच. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाच्या नाकर्तेपणाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow