पूर्वविभाग मध्यवर्ती गणेशोत्सव ट्रस्टी अध्यक्षपदी प्रा.दासरी, उपाध्यक्ष कारमपुरी, सचिव दिड्डी काका

गेल्या चार वर्षांपासून पूर्वविभागातील विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त काढण्यात येत असून पारंपरिक वाद्ये, लेझीम, टिपरी, शक्तिप्रयोग आणि विविध कलाप्रकार हे मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहेत.

Sep 7, 2026 - 10:49
 0  3
पूर्वविभाग मध्यवर्ती गणेशोत्सव ट्रस्टी अध्यक्षपदी प्रा.दासरी, उपाध्यक्ष कारमपुरी, सचिव दिड्डी काका

सोलापूर : पूर्वविभागातील ऐतिहासिक पूर्वविभाग मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या ट्रस्टी अध्यक्षपदी डॉ. प्रा. अजय दासरी, उपाध्यक्षपदी दत्तात्रय कारमपुरी, तर सचिवपदी माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी काका यांची विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.
   माजी महापौर स्व. जनार्दन कारमपुरी आणि माजी महापौर पुरणचंद्र पुंजाल यांच्या निधनामुळे रिक्त पदांवर ही निवड झाली. डॉ. दासरी यापूर्वी विश्वस्त सचिव होते.

चार दशकांची सांस्कृतिक परंपरा

सन १९८३-८४ च्या सुमारास स्थापन झालेल्या या मंडळाने चार दशकांहून अधिक काळ पूर्वविभागातील गणेशोत्सवाला सांस्कृतिक, सामाजिक, बौद्धिक, शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध स्वरूप देण्याचे कार्य केले आहे. पूर्वविभागात आज पाचशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवितात.

‘उद्योग बँक’ बंद पडल्यानंतरही माजी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ तसेच पूर्वभाग एमआयडीसी रोटरी क्लबच्या सहकार्याने ‘उद्योग बँक बौद्धिक व्याख्यानमाला’ सुरू ठेवून या परिसराची बौद्धिक परंपरा अखंडित राखली आहे.

डॉल्बीमुक्त परंपरा
गेल्या चार वर्षांपासून पूर्वविभागातील विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त काढण्यात येत असून, पारंपरिक वाद्ये, लेझीम, टिपरी, शक्तिप्रयोग आणि विविध कलाप्रकार हे प्रमुख आकर्षण आहे. ‘भक्ती, संस्कृती, प्रबोधन आणि सामाजिक एकोपा’ या चतुःसूत्रीवर आधारित गणेशोत्सवाची परंपरा यापुढेही अधिक व्यापक आणि शिस्तबद्ध पद्धतीने जोपासण्याचा संकल्प नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल मध्यवर्ती ट्रस्टचे सर्व विश्वस्त, विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्तांनी अभिनंदन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow