म.फुले जन्मद्विशताब्दी; मंगळवारी फुले विचार प्रबोधन पर्वचा शुभारंभ

प्रा. दीपक पवार (मुंबई) यांचे व्याख्यान, वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम, म.फुले विचार संमेलन होणार

Jul 4, 2026 - 21:26
 0  2
म.फुले जन्मद्विशताब्दी; मंगळवारी फुले विचार प्रबोधन पर्वचा शुभारंभ

सोलापूर : बहुजन उद्धारक, स्त्रिया व अस्पृश्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे, शेतकरी व कष्टकरी समाजाच्या प्रश्नांवर संघर्ष उभारणारे तसेच जात वर्चस्वविरोधात लढा देणारे क्रांतिबा महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त फुले विचार प्रबोधन पर्व साजरे करण्यात येत असून यानिमित्त प्रा.दीपक पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन कले, अशी माहिती महात्मा जोतिबा फुले जन्म द्विशताब्दी समितीचे अध्यक्ष प्रा.नरेश बदनोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    या प्रबोधन पर्वाचा शुभारंभ मंगळवार ७जुलै  रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार आहे. उद्घाटन प्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा.डॉ. दीपक पवार यांचे ’महात्मा जोतिबा फुले आणि सत्यशोधक चळवळ’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. 
   महात्मा फुले हे काळाच्या पुढे विचार करणारे कृतीशील समाजसुधारक होते. त्यांच्या विचारांचे प्रबोधन नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, समाजात समतेची जाणीव अधिक दृढ व्हावी आणि परिवर्तनवादी विचारांची चर्चा व्यापक व्हावी, या उद्देशाने महात्मा जोतिबा फुले जन्म द्विशताब्दी समिती वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहे. यामध्ये फुले साहित्य आणि कार्य या विषयांवर व्याख्यान होणार आहेत. सोबतच शाळा व महाविद्यालयीन स्तरावर फुले चरित्र आणि विचारांवर आधारित वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय वर्षाच्या मध्यावधीत महात्मा फुले विचार संमेलन आयोजित करण्याचाही समितीचा संकल्प असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड.शंकर पाटील यांनी सांगितले. 
   या कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि पुरोगामी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  समितीचे सचिव अ‍ॅड. मनिष गडदे पाटील, उपाध्यक्ष प्रा.एम. आर. कांबळे, कोषाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद पाटील यांच्यासह इतर सदस्य यानी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow