इंधनवर उतारा; अधिक मासात जावयाला घोडी गिफ्ट
महागाई आणि दरवाढीच्या काळात पेट्रोलपेक्षा घोडीच परवडली, शिवाय जावयाची हौस पुरवली
(विजयकुमार पिसे)
जावयाला घोडे आवडतात म्हणे. त्यावरून एक म्हण देखील प्रचलित आहे. या म्हणीची प्रचिती धोंडा महिना अधिक मासात आली. सासर्याने हे औचित्य साधून लाडक्या जावयाला चक्क घोडी भेट म्हणून दिली आहे. महागाई आणि पेट्रोल दरवाढ आणि टंचाईवर उतारा असा योग देखील यानिमित्ताने जुळून आला आहे. ही नवलाई धाराशिव जिल्ह्यातील असून सासर आणि जावयाचं नातं असं देखील असू शकतं, याची खमंग चर्चा रंगली आहे.
धोंड्याच्या महिन्यात जावयाला भोजनाचं निमंत्रण दिलं जातं. शिवाय औक्षण म्हणून भेेटवस्तू देण्याची परंपरा आहे. चांदीचे वहाण (चपला) ही वार्ता यापूर्वीच कानावर आली असेल. त्यावर ही वार्ता कडी करणारी आहे. जावयाला आयुष्यभर लक्षात राहील अशी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न म्हणून *पारा गावाचे सासरे विलासराव झांबरे यांनी *ईट येथील जावई वकील क्रांतीसिंह राऊत यांना त्यांनी घोडी देण्याची आगळी वेगळी हौस पुरवली आहे. महागाई आणि पेट्रोल दरवाढीने सगळेच त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पेट्रोलपेक्षा घोडीच परवडली, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.शिवाय सासरे अणि जावयाचे कौतुक देखील होत आहे. मात्र या घोडीची किंमत किती हे विचारू नये, एवढी खबरदारी उत्सुक कर्त्यांनी घेतलेली बरी.
दरम्यान या जावयास घोडी बाळगण्याची हौस आहे. त्यांच्या शेतात आजदेखील ते घोडीवरच जातात. घोडी हौस म्हणून आणि उपयोगिता म्हणूनही वकील जावई तसे हुश्श्यार आहेत, हे यानिमित्ताने समोर आलं आहे. घोडीला पेट्रोल, डिझेल, गॅस लागत नाही, पण तगडा घास/चारा (खुराक) लागतो, हे मात्र तितकंच खरं.
What's Your Reaction?