गोकुळ शुगरकडून शेतकर्‍यांची लूट, गोड उसाची, कडू कहाणी

थकीत उस बिलासाठी 30 गावच्या शेतकर्‍यांचा सहपरिवार ठिय्या

May 27, 2026 - 09:13
 0  59
गोकुळ शुगरकडून शेतकर्‍यांची लूट, गोड उसाची, कडू कहाणी

सोलापूर/नळदुर्ग : दक्षिण सोलापूर,अक्कलकोट आणि तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी ऊस घातल्यानंतरही त्यांची थकीत बिले देण्यास गोकुळ शुगरने काहीच हालचाल केली नाही. उलट शेतकर्‍यांची फसवणूक केली. प्रशासनाने कारवाई करून थकीत बिल देण्याची कार्यवाही करावी या मागणीसाठी टाहो फोडणारे ठिय्या आंदोलन 30 गावच्या शेतकर्‍यांनी सहकुटुंब सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.

   अक्कलकोट तालुक्यातील सत्ताधारी पक्षाचे बडे राजकीय नेते दत्ता शिंदे परिवाराने गोकुळ शुगरसाठी 2026/26 गाळपासाठी शेतकर्‍यांचा ऊस घेतला. या बदल्यात एक रुपयादेखील शेतकर्‍यांच्या पदरात घातला नाही. गेले पाच महिने शेतकरी गोकुळ शुगर, साखर आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. पण शेतकर्‍यांची कसलीच दखल घेतली नाही. त्यांचे आर्थिक चक्र बंद पडले आहे. उसाची रक्कम 15 दिवसात देणे शासन कायद्याने बंधनकारक आहे. पण साखर आयुक्त पुणे आणि साखर आयुक्त सोलापूर यांनी कारवाई केली नाही. यामुळे हवालदिल शेतकरी संतप्त झाले आहेत.

   गत दोन दिवसांपासून तीन तालुक्यातील 30 गावच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सोलापुरात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात मागण्यांच्या निवेदनावर अरविंद घोडके,अ‍ॅड.अमोल पाटील, अंबादास नरे,सचिन जवळगे,प्रशांत सुरवसे,गणेश नरे, रघु बनसोडे आदी 300 शेतकरी कुटुंबियांच्या स्वाक्षर्‍या आहेत. गोड उसाची कडू कहाणी शेतकर्‍यांच्या वाट्याला आली, अशी अस्वस्थ भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.   

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow