पुण्यात मुसळधार पावसाचा कहर; वारकऱ्यांनी थेट पुण्यात यावे
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून ४ जणांचा मृत्यू, तर २ जण बेपत्ता आहेत. ५६८ नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. पुण्यास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. देहू आणि आळंदीहून पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी थेट पुण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने प्रशासनावर ताण वाढला असून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषदेत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले.
त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत ५६८ नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून २ जण बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी दिली. बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू असून बाधित नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.
हवामान विभागाने पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवल्या असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदी येथून पालखी प्रस्थान होणार असल्याने वारकरी बांधवांनी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यक असल्यास थेट पुण्यात यावे, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.
याशिवाय, खडकवासला धरणात २०.३ टक्के पाणीसाठा झाला असल्याची माहिती देण्यात आली. सततच्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महानगरपालिका हद्दीतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून वारकऱ्यांच्या निवासाची आवश्यक व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?