सेजल पवार प्रकरणाला नवे वळण; KEM प्रशासनाची कठोर भूमिका, निलंबनाची शक्यता

प्रणित मोरेच्या शोतील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या डॉ. सेजल पवार यांच्यावर केईएम प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता. सायबर चौकशीसह प्रकरणाला नवे वळण.

Jun 13, 2026 - 13:09
 0  8
सेजल पवार प्रकरणाला नवे वळण; KEM प्रशासनाची कठोर भूमिका, निलंबनाची शक्यता

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील एका व्हिडिओमुळे वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या डॉ. सेजल पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मृतदेह आणि अवयवदानासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यांमुळे आधीच गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात आता केईएम वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केईएम महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात काही दिवसांसाठी निलंबनाची कारवाई होऊ शकते. संबंधित कार्यक्रमातील वक्तव्यांमुळे समाजातील विविध घटकांच्या भावना दुखावल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यासाठी दोन सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली असून, समितीकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने डॉ. सेजल पवार यांच्या पालकांनाही चर्चेसाठी बोलावले आहे. चौकशी अहवालाच्या आधारे पुढील शिस्तभंगात्मक कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रणित मोरेच्या स्टँडअप शोदरम्यान डॉ. सेजल पवार यांनी रुग्णालयात येणाऱ्या मृतदेहांबाबत केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

या प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केला असून, डॉ. सेजल पवार यांच्यासह स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

वादग्रस्त व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकता, सार्वजनिक वक्तव्यांची जबाबदारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावरही नव्याने वाद सुरू झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow