नाशकात टायगर घायाळ! महायुतीच्या "गोकुळा"त ऑपरेशन
शिंदेंनी आयते ६खासदार फोडले, तर गोकुळ गीतेनी माघारनंतरही नगरसेवक फोडले.नाशिक,सातारा,सोलापुरात महायुतीमध्ये कुरघोडी
(विजयकुमार पिसे)
मैदानात स्पर्धकच शिल्लक ठेवायचा नाही, बिनविरोध निवडणुका हेच मिशन. पण जिथे निवडणुका झाल्या. तिथे महायुतीमध्ये कुरघोडी. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी सहा खासदार फोडले. मात्र त्यांच्या नाशकात भाजपा बंडखोर गोकुळ गीतेंच्या कोम्बींग ऑपरेशनमुळे टायगर घायाळ झाला. महायुतीच्या अंतर्गत "गोकुळा"त ऑपरेशन झाले आहे. राज्यात१७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अंतिम निकालानंतरचा हा निष्कर्ष होय.
बिनविरोध निवडणुकांमध्ये याची खबर कुणालाच लागू न देता मोहीम फत्ते केली जाते. आताच्या राजकारण्यांनी बिनविरोधची बांग जोरात दिली. आणि सर्वांनाच सावध केले. अर्थात निवडणुका झाल्या असत्या तर यापेक्षा निकाल काय लागला असता,त्याचे नाशिक हे उदाहरण. १७ पैकी १६जागा महायुतीने जिंकल्या. नाशिकची जागा अपक्ष, बंडखोर भाजपा उमेदवार गोकुळ गीते यांनी १०९मतांच्या फरकाने जिंकली. शिंदे सेनेचे नरेंद्र दराडे यांना धक्का देत ऑपरेशन टायगरचा "वाघ घायाळ" केला. गीते यांना३५७ तर दराडे यांना २४८ मते मिळाली. नाशकात दराडेंच्या विरोधात तीन भाजपा उमेदवारांनी बंड केले होते. यापैकी प्रसाद हिरे, गणेश गीते यांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतली. राहिले गोकुळ गीते. दराडेंच्या मुलाने त्यांचा बाप काढला, म्हणून त्यांनी शिंदे सेनेच्या दराडेंनाच "बाप" काढून दाखवला.
सातारा, सांगली मतदारसंघ भाजपाने जिंकला. पण तिथे शिंदे सेना,अजीतदादा गटाने भाजपाचे धैर्यशील कदम यांना शतप्रतिशत मतदान केले नाही. १०० मते मविआचे अभयसिंह जगतापांच्या पारड्यात गेली आहेत. सोलापुरात अपेक्षेप्रमाणे भाजपाचे राजेंद्र राऊतांनी बाजी मारली. त्यांना ५०० पेक्षा अधिक मते अपेक्षित होती. तिथे ४८३ मते मिळाली. १३मते अवैध ठरली, ही मते म्हणजे "तेरा(13) मेरा, साथ नही" असा संदेश देणारी आहेत.
नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज माघारीनंतरही गोकुळ गीते यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे थेट दिल्लीहून त्यांच्या माघारसाठी प्रयत्न केले. संकटमोचक गिरीश महाजनांचे गीते समर्थक, त्यांनाही म्हणे दाद दिली नाही. अखेर देवाभाउंनी लक्ष घातले. तेव्हा गीते यांनी प्रचारातून अर्थात निवडणुकीतून अंग काढून घेत माघार जाहीर केली. निवडणूक झाली. मतदानही झाले. निकालानंतर वाघ घायाळ झाल्याचे चित्र समोर आहे. जळगावात देखील निवडणूक झाली असती, सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांनी माघार घेतली नसती तर तिथेही भाजपाला दगाफटका शक्य होता. याचा अर्थ महायुतीमध्ये दगाफटक्याची नीती अवलंबिली जाते. शिंदे एकीकडे ठाकरेंचे आयते ६खासदार फोडून सिंहगर्जना करत असतील. पण भाजपाने ठरवले तर वाघाचे काय होईल? नाशिकच्या निकालाचा हा संदेश आहे.
What's Your Reaction?