पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करणार : मुख्यमंत्री फडणवीस
आषाढीची शासकीय महापूजा श्री. व सौ. फडणवीस हस्ते संपन्न
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करताना कोणावरही अन्याय न होता, सर्वांचे पुनर्वसन करून येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने, सौ. प्रभावती बाबासाहेब माने यांच्यासमवेत केली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने सत्कारप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मागील काळात सुरू केलेले मंदिर विकासाचे काम बहुतांश पूर्ण झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, "पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येतात. येथे अत्यंत कमी जागा आहे. आता मोठी जागा तयार करणे गरजेचे आहे. यावर्षी हे काम सुरू करायचे आहे. कॉरिडॉर विकासात येथील व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील, भाडेकरूंची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी होईल."
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील आहे. विठुरायाची सेवा जरी आपल्याला करता आली नाही, तरी वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तरी ती सेवा विठुरायापर्यंत पोहोचते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडावे यासाठी ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आणि थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे."
प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. "श्री विठ्ठल मंदिराला पाठबळ देणे, निधी देणे आणि विकास करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आज विठुमाऊलीच्या दर्शनासाठीच्या रांगेचे अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले आहे, असे औसेकर म्हणाले.
शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील बाबासाहेब माधव माने आणि सौ. प्रभावती माने या दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना वर्षभर मोफत एसटी प्रवास पास मुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
What's Your Reaction?