SMC NEWS : मनपात नालेसफाई, पहिली विकेट पडली!
मठपती सिटी इंजिनिअर; वाघमारे अतिक्रमण, तर आकुलवार सिटी बस विभागात भाजप नगरसेवक जाधवांचा अनंत धसका; औरंगाबादकर, बडूरवाले, सावस्कर व आता..!
(विजयकुमार पिसे)
सोलापूर : महापालिकेतील नालेसफाईच्या कथित घोटाळ्यात तब्बल १९ अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर पहिली विकेट पडली. २४ तासात मनपात खांदेपालट झाले. नगर अभियंता अर्थात सिटी इंजिनिअर पदाचा अतिरिक्त पदभार कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांना देण्यात आला. तर प्रभारी नगर अभियंता सारिका आकुलवार वडनाल यांची बदली परिवहन नियंत्रण अधिकारी म्हणून करण्यात आली. तसेच अविनाश वाघमारे अतिक्रमण प्रतिबंधक झाले.
गत मनपा सभेत भाजपा नगरसेवक अनंत जाधव यांनी नालेसफाईत 'हाथ की सफाई' झाली, असा खळबळजनक आरोप करून भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. या प्रकरणाच्या चौकशीनंतर अहवालात ८१ लाखांची जादा बिले अदा झाली तसेच १९ जणांवर ठपका ठेवला. पुढे २४ तासात आयुक्त ओम्बासे यांनी सफाई मोहीम राबविली. तसेच संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
दरम्यान सायंकाळी नगर अभियंता पदाचा कार्यभार मठपती यांच्याकडे सोपविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले.
सिटी इंजिनिअर काटेरी खुर्ची
मनपात नगर अभियंता (सिटी इंजिनिअर) हे पद नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. नामुष्की घेऊनच पायउतार व्हावे लागले आहे. यापूर्वी मोहन औरंगाबादकर, बडूरवाले, सुभाष सावस्कर ही वानगीदाखल काही उदाहरणे आहेत.
दरम्यान आगामी मनपा सभेत नगर अभियंता नियुक्तीसंदर्भात आयुक्त ओम्बासे प्रस्ताव पाठविणार असल्याचे समजते. तूर्तास तरी सत्ताधारी निष्ठावंत भाजपामुळे भ्रष्टाचारावरून पहिली विकेट पडली, अशी चर्चा आहे. हा 'अनंत' धसका मानला जात आहे.
What's Your Reaction?