पुणे पदवीधरमधून इनकमिंग लाड?
शिक्षक मतदारसंघ सेना की भाजपा.. निकष एकच निवडून कोण येतो; निष्ठावंत असलाच पाहिजे असे नाही. तेव्हा इनकमिंगला मिळणार संधी!
(विजयकुमार पिसे)
पुणे : पुणे विभागासह राज्यात नागपूर, अमरावती, संभाजीनगर विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. गतवेळी पुण्यातून पदवीधरची जागा शरद पवारांचे निकटवर्तीय अरुण लाड तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी भाजपावर मात केली. तसेच अन्य तीन मतदारसंघातही भाजपाचा अनपेक्षितच पराभव झाला. शिवाय शिक्षक मतदारसंघही गमावला. आता भाजपाकडे अनेक इच्छुक आहेत. प्राप्त परिस्थितीत विद्यमान राष्ट्रवादीचे आ.अरुण लाड भाजपात आले आहेत. त्यांना नव्हे तर त्यांचे पुत्र शरद लाड यांना संधी अपेक्षित मानली जाते. त्यांचा भाजपा प्रवेश म्हणे या अटीवरच झाला. शिवाय प्रदेशाध्यक्षांचेे ओएसडी कराड, सातारा, सांगलीत ठाण मांडून आहेत. त्यामुळे भाजपा यांचेही लाड पुरवणार अशीच ठाम समजूत झाली आहे. असो.
जनाधार, दिल्ली ते गल्लीत सत्ता असताना गतवेळी नागपूरमधूनही (फडणवीस निकटवर्तीय संदीप जोशी) भाजपाला झटका बसला. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक हा मतदार म्हणजे भाजपाचा हक्काचा मतदार. तरीही पराजय का झाला? याचे प्रमुख कारण म्हणजे विजय गृहित धरून मतदार नोंदणीमध्ये केलेला आळस. त्यामुळे पुणे पदवीधरमधून गतवेळी चंद्रकांत दादा पाटील उभे राहिले असते तरी त्यांना चकवा दिला असता. कारण याच मतदार संघात प्रकाश जावडेकर सारखे फेव्हरिट मातब्बर यापूर्वी पराभूत झाले आहेत. तशीच स्थिती नागपूरमधून. तिथे संदीप जोशी पराभूत झाले होते. त्यामुळे आमचाच विजय गृहित धरला तर काय होते. पुणे आणि नागपूर ही दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
आता मग काय? गतवेळचीच स्थिती जवळपास आहे. कारण मतदार नोंदणी अपेक्षित इतकी झालेली नाही,असे कळते. म्हणून मंत्र्यांचे सोलापुरात मतदार नोंदणी विषयीचे वक्तव्य. सोलापुरात 'निधी दिला की कार्यकर्ते काम करतात'. वास्तविक हा कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा अपमान होईल. दाम दिला तरच कार्यकर्ते काम करतात का? मंत्री म्हणतात तर त्यात तथ्य असू शकेल? कारण आता इर्दगिर्द असणारे बहुतांश कार्यकर्ते इनकमिंग कॅटेगिरीमधील आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे नवीन झालेली भरतीच सगळीकडे चमकताना दिसते. आणि नेत्यांच्या निरीक्षणानुसार दाम असेल तरच काम. म्हणून ज्या दिवशी असे विधान आले, त्या दिवसापासूनच लेन-देण कार्यकर्त्यांचे व्हाटस अप ग्रुप अॅलर्ट झाले. त्यांनी मंत्री, आमदार, अध्यक्ष यांचा आदेश शिरसावंद्य मानला. सोशल मिडियावर पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणी सुरू झाली हो, म्हणून दवंडी पिटली. पण ही हवा दोन, तीन दिवस चालली. यामध्ये पुन्हा राम भरोसे झाले असेल तर?
दुसरे कारण यापेक्षा गंभीर असल्याचे मानले जाते. या मतदारसंघात प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे (पुणे) यांच्या बरोबरीने अनेक इच्छुक मंडळीनी गेले अनेक वर्षे सदस्य नोंदणीपासून दादा पाटलांना दोन दोन वेळा निवडून आणण्यात कंबर कसली आहे. अशा कार्यकर्त्यांकडे साफ दुर्लक्ष झाले. नव्हे तर त्यांना देखील कळून चुकले. आता आपल्याला संधी नाहीच. त्यामुळे असे इच्छुक नेतेमंडळी या निवडणुकीत किती सक्रिय राहतील?
पांडे यांच्याकडे शताब्दी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची धुरा दिली आहे. पुण्यात (23 ऑगस्ट रोजी, कौशिक आश्रम) संघाची समन्वय बैठक झाली. तीत राजेश पांडे यांनी संपूर्ण साहित्य संमेलनाची भव्यता (नांदी पासून) अधोरेखित केली. दादा पाटलांनीच याविषयी निवेदन करण्याचे त्यांना सुचविले होते.
भाजपाने सांगलीचे इनकमिंग लाड यांना शब्द दिलाय म्हणे. आणि तो पाळणे बंधनकारक नसेल तर.. आता यांचे लाड नकोत.. म्हणून जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना (पांडे, भांडारी, रोहन देशमुख) संधी दिली तर आश्चर्य वाटू नये.
शेवटी निकष एकच निवडून कोण येतो! त्यामध्ये निष्ठावंत असलाच पाहिजे असे नाही. तर मग कुणीही चालवून घ्यावे लागेल. आणि निवडून देखील आणावे लागेल. अन्यथा खैर नाही.
What's Your Reaction?