भाईंचा मास्टर स्ट्रोक!शिवसेनेची ज्योती बने ज्वाला,थेट राज्यसभेत
तडीतापडीच्या मोची समाजाला न्याय,सोलापूरला आणखी एक खासदार, 2029लोकसभेसाठी चेहरा?
(विजयकुमार पिसे)
धक्कातंत्राची अनेकार्थाने व्याख्या केली जाते,आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे अनेक रथी आहेतच. या सर्वांवर एकनाथ भाईंनी मास्टर स्ट्रोक मारला. ना कुणाच्या ध्यानीमनी,ना चर्चेत, असा तडीतापडीचा चेहरा थेट राज्यसभेत पाठवून मोची समाजाला खर्या अर्थाने न्याय दिला. प्रा.ज्योती वाघमारे यांच्या रूपाने सोलापूरला आणखी एक खासदार मिळाला असून यदाकदाचित 2029 लोकसभेसाठी हा चेहरा कामी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुरुवारी 5 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिवसेनेकडून शिक्कामोर्तब करताना एकनाथ शिंदेंनी अन्य पक्षांना व सहकार्यांनाही चकीत करताना एक पाऊल पुढे टाकले. ज्योती वाघमारे जर भाजपात असत्या तर इतकी मोठी संधी मिळाली असती का? फार तर नगरसेविका म्हणूनच. अशी कुजबूज आहे. कथित बनचुके काही नेत्यांना वाघमारेंच्या निवडीने धक्का बसला आहे. सोलापूरच्या विद्यमान खा.प्रणिती शिंदे यांच्या एकेकाळच्या निकटवर्तीय, काँग्रेस शहर महिला आघाडी अध्यक्षा, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात लढण्याची तयारी केलेल्या ज्योतीतार्ईना लोकसभा निवडणुकीसाठी प्रोजेक्ट म्हणून हा मास्टर स्ट्रोक असू शकेल.
मूळच्या आंबेडकरी विचाराच्या व विद्रोही चळवळीच्या प्रा.वाघमारे थेट शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारेंचा मुकाबला करण्यासाठी शिंदेंनी प्रवक्त्या म्हणून धुरा सोपविली. शालेय जीवनात निवेदक,सूत्रसंचालक म्हणून उमेदवारी, तेव्हा अर्थाजर्नाचे हेच साधन होते. पुढे शिक्षण क्षेत्रात अध्यापन,प्राध्यापकी सेवा रुजू केली. 2006 मध्ये सोलापुरात अ.भा.मराठी साहित्य संमेलन भरवले गेले, त्याचवेळी नॉर्थकोटवर विद्रोही साहित्य संमेलन प्रा.ज्योती वाघमारे यांनी गाजवले. तेव्हापासून त्यांचे नाव चर्चेत राहिले. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी यासह तेलुगू आणि कन्नड अशा पाच भाषांवर प्रभुत्व असून वादविवादात अन्य महिला नेत्यांना निश्चितच मागे टाकतील. प्रा.ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे दलित पँथरचे, 1992 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
प्रा.ज्योती वाघमारे यांना संधी दिल्याबद्दल सोलापुरात डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ मोची समाजबांधवांनी जल्लोष केला. यावेळेस माजी अध्यक्ष अंबादास (बाबा) करगुळे यलप्पा तुपदोळकर, सन्नी म्हेत्रे, रवि नायक म्हेत्रे, अविनाश महाराज सज्जन, नरसिंग वल्लापोलु, भीमा आसादे, सुधीर संगेपाग, ईश्वर म्हेत्रे, अंबादास माढेकर ,अजय दिड्डी, पिंटु गिरगल, संतोष मरेड्डी, भगवान करगुळे, जितेश मासे आदि मोची समाजातील युवक उपस्थित होते.
मनपा निवडणुकीत भाजपाकडून मोची समाजबांधवांना पुरेसा न्याय मिळाला नाही,असा सूर आहे, पण शिवसेनेने संधी दिली, अशा भावना मोची समाजबांधवांनी व्यक्त केल्या आहेत.
What's Your Reaction?