पालघर साधू हत्याकांडामधील आरोपी भाजपात पवित्र!
...नंतर प्रवेश रद्द करण्याची ओढवली नामुष्की, तुळजापुरात ड्रग माफीया, सोलापुरात संघ स्वयंसेवकाला मारहाण करणारा गुंड देखील पवित्र, पार्टी विथ डिफरन्सची अजब गजब थेअरी, पालघरचा पक्षप्रवेश रद्द होतो, तुळजापूर,सोलापूरचे काय?
(विजयकुमार पिसे)
एप्रिल 2022चे लॉकडाऊन, ठाकरे सरकारच्या काळात पालघरमध्ये दोन साधूंचे नृशंस हत्याकांड झाले. प्रकरण देशभर गाजले, याबद्दल तीव्र संताप व्यक्त झाला. विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली. आता मात्र या हत्याकांड प्रक़रणाला कलाटणी आली असून हत्याकांडमधील एका मुख्य आरोपीलाच भाजपात प्रवेश देऊन हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रक़ार घडला आहे. दरम्यान काही तरी प्रमाद घडला? परंतु जसे काही घडले नाही, अशी सारवासारव करीत 24 तासात हा पक्ष प्रवेश रद्द करीत असल्याची भाजपावर ओढवली. ही एकच घटना आहे का?
गेल्या आठवड्यात तुळजापुरातील ड्रग माफीयाशी संबंधितांना आ. राणा जगजीतसिंह यांनी पक्षात प्रवेश दिला. तर सोलापुरातील बाळे भागात एका गुंडालाही थेट प्रदेश कार्यालयाने भाजपात प्रवेश देऊन पवित्र करून घेतले. विशेष म्हणजे या गुंडाने स्थानिक संघ स्वयंसेवकाला बेदम मारहाण केली होती. पार्टी विथ डिफरन्सच्या अजब गजब थेअरीने कुठे नेऊन ठेवला *भाजपा(महाराष्ट्र) असा प्रश्न उपस्थित होत आहे.
16 एप्रिल 2022 रोजी पालघरमध्ये दोन साधूंची जमावाने हल्ला करून जिवंत ठार केले, ही संतापजनक घटना लॉकडाऊनमध्ये उध्दव ठाकरे सरकारच्या काळात घडली होती. तेव्हा भाजपाने ठाकरे व महाविकास आघाडीला लक्ष्य केले. एकनाथ शिंदेनी या घटनेचे निमित्त करून शिवसेनेत बंड केले. या घटनेतील एक मुख्य आरोपी काशीनाथ चौधरी यांना 3 हजार समर्थकांसह भाजपात प्रवेश दिला. विशेष म्हणजे चौधरी यांनी यावेेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. निवडून येण्यासाठी काय पण! या थराला जाण्याची भाजपाची आजची इन्स्टंट थेअरी किती धोकादायक आणि गंभीर वळणावर गेली आहे. त्यामुळे *"कुठे नेऊन ठेवला भाजपा"* असा प्रश्न उपस्थित होतो.
नाशिक, तुळजापूर,सोलापुरातही तेच
पालघरची घटना गाजली म्हणून भाजपाने चौधरी यांचा पक्ष प्रवेश रद्द करून एक पाऊल मागे घेतले. असाच प्रकार नाशकातही झाला. बडा ठेकेदार सुधाकर बडगुजर यांचा भाजपा प्रवेश म्हणजे पापम पवित्रम्. दाऊद इब्राहिमच्या साथीदाराबरोबर बडगुजर नाचतानाचे व्हिडिओ भाजपानेच व्हायरल केले, ठाकरे सेनेवर टीकेची झोड उठविली. स्थानिक आ.सीमा हिरे आणि अन्य भाजपा आमदारांचा विरोध असतानाही बडगुजर भाजपाचे खर्या अर्थाने "सुधारक" झाले.
तुळजापूरचे ड्रग प्रकरण अजूनही गाजते आहे. त्याचे धागेदोरे तुळजापूर, दक्षिण सोलापूर, सोलापूर आणि मोहोळ मार्गे मुंबई पर्यंत आहेत. यामधील दोन आरोपींना तुळजापूरचे आ.राणा जगजीत सिंह यांनी भाजपात प्रवेश दिला. विशेष म्हणजे राणा हे अजीतदादांचे मेव्हणे आणि खा.सुनेत्राताई पवार यांचे भाऊ. त्यांच्या परिवारातील एका गंभीर प्रकरणामुळे राणा यांना 2019 मध्ये भाजपात येणे भाग पडले. शिवाय अंजली दमानिया यांनी 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमवारीच राणांवर केला आहे.
संघ स्वयंसेवकाला मारहाण..तरीही
बाळे येथे संघाच्या एका प्रक़ल्पावर कार्यरत संघ स्वयंसेवकाला एका गुंडाने बालू तांबे याने बेदम मारहाण केली. या गुंडाला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आले होते. तरीदेखील या गुंडाला प्रदेश भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पक्षात प्रवेश देउन पवित्र करण्यात आले. म्हणजे बाळासाहेब केले. नंतर हे प्रक़रण चव्हाट्यावर आले. पालकमंत्र्यांपर्यंत सदर स्वयंसेवक श्रीकांत मोरे यांनी आपली कैफीयत मांडण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप मंत्र्यांकडून कसलीच हालचाल दिसत नाही.
*कर्तव्यदक्ष संघ स्वयंसेवक आणि निष्पाप साधूंची हत्या तसेच नशामु़क्त समाजासाठी सरसंघचालक आणि विश्व हिंदू परिषदेचे अभियान हे चित्र एकीकडे आणि भाजपाची इन्स्टंट थेअरी समाजमन अस्वस्थ करणारी आहे. पक्षाच्या आजच्या धुरिणांना आपले पूर्वज आणि विचारांच्या/विरासत वारसांचे बहुदा विस्मरण झाले असावे,असाच अन्वयार्थ काढावा का?
What's Your Reaction?