माजी उपमहापौर प्रमोद गायकवाडसह 2 मुलांचा जामीन अर्ज फेटाळला
अन्य 4 आरोपींचा निर्णय प्रलंबित, वैभव वाघे खून खटला

सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा खून तसेच अन्य पिडीताना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांचा नियमित जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला तर संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे, समरसेनजीत गायकवाड यांच्या नियमित जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला.
यात हकिकत अशी की, दि.१/१/२५ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिध्दार्थ हौसिंग सोसायटीतील रिंकि शिवशरण, अदित्य दावणे, पुथ्वीराज शिरसे व रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहारजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबलेले होते. त्यावेळी सनी निकंबे हा दारु पिऊन पिडीत महिलेच्या अंगावर आला, त्यावेळी ऋतूज गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड याने आवाज देऊन “गाडीतील रॉड काढून घेऊन या, या लोकांना माज आलेला आहे, कुठले भिकारडे येथे आलेले आहेत”, असे ओरडून शिवीगाळ करून त्यांना बोलावून घेतले. सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पिडीत महिला व नेत्र साक्षीदार यांना मारहाण केली, त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली व त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असता समरसेनजीत गायकवाड याने त्याला अडवून पाडले व रस्त्यावरून फारशी उचलून वैभव वाघेच्या डोक्यात घातली. त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दंडुकाचे सहाय्याने त्याचे सर्वांगावर मारहाण केली. प्रमोद गायकवाड याने लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड व डोक्यात मारले, प्रसेनजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांनी लोखंडी रॉडने त्याचे हाता पायावर, डोक्यावर, पाठीवर, व शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली. अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली. प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे यास सोडविण्यास कोणीही पुढे आले नाही तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले. वैभव वाघे यास सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर दि. ०६/०१/२०२५ रोजी तो मरण पावला.
यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून जामीनास विरोध दर्शवून आरोपींविरुद्ध यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी निदर्शनास आणली. तसेच सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायालयाने प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांचा जामीन अर्ज नामंजूर केला व उर्वरित आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणीकरिता दि.20/9/25 रोजी तारीख दिली आहे.
मूळ फिर्यादीतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रुपनर, सरकार पक्षातर्फे अँड.दत्तूसिंग पवार तर आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. राज पाटील व अॅड. किरण सराटे काम पाहत आहेत.
What's Your Reaction?






