मनसे,काँग्रेस,अजीतदादा गटाच्या नेत्यांची प्रॉपर्टी जप्त

पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यात कारवाई, राज्यात निवडणुका संपल्या, विरोधक सत्ताधार्‍यांच्या रडारवर

Feb 28, 2026 - 11:50
Mar 1, 2026 - 23:58
 0  145
मनसे,काँग्रेस,अजीतदादा गटाच्या नेत्यांची प्रॉपर्टी जप्त

(विजयकुमार पिसे)
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधक नावालाच उरला आहे. आता त्यांचे अस्तित्वही मिटण्याची शक्यता असून पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातील नेत्यांच्या प्रॉपर्टीवर बँकांकडून जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
राज्यात नगर पालिका,नगर पंचायत, महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत सत्ताधार्‍यांनी हातचलाखी करून चमत्कार घडवून आणला, अशी चर्चा असतानाच निवडणुका संपताच विरोधकांवर जप्तीचा घाव बसणार आहे. बँक जप्तीची कारवाई आणि निवडणुका याचा तसा दुरान्वयाने संबंध नाही. परंतु थकीत कर्ज न फेडल्यामुळे बँकांनी मार्च एन्डींगची वसुली सुरू केली आहे. पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील मनसे,अजीतदादा गट आणि काँग्रेस नेते रडारवर आले आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रने सोलापूरच्या मजरेवाडी हद्दीत पंढरपूर तालुक्यातील मनसे नेते तथा राज ठाकरेंचे निकटवर्तीय दिलीप धोत्रे कुटुंबियांच्या फ्लॅटवर 27 लाख 737 रुपये थकबाकी वसुलीसाठी कारवाई आणली आहे. मजरेवाडी  हद्दीतील वैष्णवी सिटी फ्लॅट क्र.सी8 ह्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची नोटीस बजावली आहे. तूर्तास या फ्लॅटची किंमत 28.46 लाख रुपये दाखवली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव (तिर्‍हे) यांच्या एका मालमत्तेवर थकबाकी  असून त्यांच्यावरही बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. जाधव यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात पृथ्वीराज दिलीप माने होते. यामध्ये जाधवांचा पराजय झाला. तसे पाहता जाधव आणि माने परिवारात नाते संबंध आहे. मात्र निवडणूक, जय पराजय आणि नातेसंबंध यांच्याशी बँक कारवाईचा संबंध नाही. 
युनियन बँकेने लोकशक्ती शुगरचे माजी चेअरमन, माजी कार्य.संचालक आणि अन्य संचालकांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. माजी संचालक व जामीनदारांची 24 इतकी आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकशक्ती शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंड.चे मनोहर डोंगरे (माजी चेअरमन), विजयराज डोंगरे माजी कार्य.संचालक, शिवानंद इरण्णा पाटील (माजी संचालक) तसेच सुमन मनोहर डोंगरे,श्रीमती अन्नपूर्णा शिवानंद पाटील याशिवाय काही माजी संचालक जामीनदार शेंडगे,मनाले,खडके,भांगे,वगरे,निकम,पुजारी,गोंडाळ,माने अशा 24 जणांचा समावेश आहे. बँकेने मजरेवाडी,तेलंगवाडी,मगरपट्टा या भागातील स्थावर मालमत्ता असून थकबाकी 37 कोटीपर्यंत आहे. डोंगरे अगदी पवार साहेबांचे निकटवर्तीय. मोहोळ तालुक्याच्या राजकारणासाठी त्यांनी भाजपात प्रवेश केला. अलीकडेच ते भाजपात आले म्हणून आपल्या अस्तित्वासाठी डोंगरे अजीतदादा गटात गेले. निवडणूक लढवली. जिंकून देखील आले. आता बँकेची कारवाई समोर आहे. दुर्दैवाने अजीतदादांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे डोंगरे परिवारासमोर नवे संकट आहे. शिवानंद पाटील हे ढोबळे समर्थक. ढोबळे सर प्रांरभीपासून पवार साहेब, नंतर भाजपा आता पुन्हा साहेबांच्या गोटात गेले आहेत. निवडणुकीनंतर बँकांची कारवाई हा निव्वळ योगायोग असून त्यास बादरायणी संबंध जोडू नये,असे म्हटले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow