काडादींचा 'भोर' पॅटर्न; चिमणी प्रक़रणात फडणवीसांना लक्ष्य
काडादी भाजपच्या वाटेवर; लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाला चॅलेंज, पवार, शिंदे यांच्याकडून झाला घात, आता ?

(विजयकुमार पिसे)
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा, त्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केलेले काँग्रेस नेते धर्मराज काडादी यांची शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून फसवणूक झाली. आता काडादी यांना त्यांच्या साखर कारखान्याची काळजी लागली असून त्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करून 'भोर' पॅटर्नचा मार्ग अवलंबण्याचा काडादी यांचा इरादा आहे. काडादींच्या समर्थक़ांनी भाजपात प्रवेश करावा, असा त्यांना सल्ला दिला आहे. साखऱ कारखान्याच्या चिमणी हटाव प्रक़रणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्मराज काडादींनी लक्ष्य केले गेले होते, ही बाब यानिमित्ताने चर्चेत आली आहे.
संपादक असलेले काडादी यांच्या मालकीच्या संचार वर्तमानपत्रात (4 सप्टेंबर) धर्मराज काडादी यांचा सत्ताधारी पक्षाकडे कल? अशी बातमी प्रकाशित झाली. तसेच त्यांच्या समर्थक़ांनी सकाळीच (मला) फोन करून काडादी यांना भाजपात येण्याविषयी वरिष्ठांकडे सुचवा, असे सांगितले होते. त्यानंतर 5 रोजी काही वर्तमानपत्रांनी (संचारच्या बातमीचा हवाला) देत काडादींचे सदर वृत्त प्रक़ाशित केले होते.
*भोर पॅटर्न काय आहे...
भोरचे तीनवेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे संग्राम थोपटे गतवर्षीच्या (2024) विधानसभा निवडणुकीत अजीतदादांच्या पक्षाचे शंकर मांडेकर कडून पराभूत झाले. पंधरवड्यापूर्वी थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर गेल्याच आठवड्यात थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्याच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जाला 409 कोटी रुपये फडणवीस सरकारने मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे अजीतदादा या निर्णयास अनुकूल नव्हते. तरीही फडणवीस यांनी कर्ज मंजुरीस पुढाकार घेतला आहे. काडादी यांच्या सिध्देश्वर साखर कारखान्याचीही आर्थिक स्थिती नाजूक़ झाली आहे. ऊस उत्पादकांची बिले, कर्मचार्यांचे वेतन थकीत आहे. यासाठी त्यांना सुमारे 200 ते 250 कोटींचे कर्ज अपेक्षित असल्याचे समजते. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्या हितचिंतकांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचा हात सोडून काडादी यांनी भाजपात प्रवेश करावा, असा आग्रह धरला आहे.
*चिमणी प्रकरणी भाजपाची कोंडी
धर्मराज काडादी यांच्या तीन पिढ्या काँग्रेसशी निगडित आहे. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावरच पूर्वीपासून त्यांची सारी भिस्त आहे. त्यामुळेच त्यांनी साखर कारखान्याची चिमणी हटवू नये यासाठी या नेत्यांनाच साकडे घातले होते. तेव्हा पवार आणि शिंदे यांनीही होटगी रोडवरील विमान उडाणात चिमणीचा अडथळा येत नाही, असा दावा करून फडणवीस सरकार हेतूपूर्वक काडादींना त्रास देत असल्याचा आरोप केला होता. काडादी यांनीही चिमणी हटाव प्रक़रणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपाला हिसका दाखवू अशी भूमिका घेवून त्यांनी अनेक गावांत भाजपा विरोधात प्रचार सभा घेतल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही भाजपाला चॅलेंज केले. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सोलापूऱ मध्य, अक्कलकोट आणि मंगळवेढा या मतदारसंघात भाजपा उमेदवार निवडून येणार नाहीत, अशीच भूमिका होती. त्यानंतर स्वत: दक्षिण सोलापूर मतदारसंघात निवडणूक लढवली. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचा त्यांना पाठिंबा होता. खा.प्रणिती शिंदे यांनी त्यांना पाठिंबाही जाहीर केला. त्यांच्या प्रचारार्थ या नेत्यांनी सभा देखील घेतल्या. परंतु काडादी भाजपाचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभूत झाले. ही अलीकडची पार्श्वभूमी आहे.
देशात आणि राज्यात राजकीय चित्र भाजपानुकूल आहे. शिंदे सेना आणि अजीतदादांची राष्ट्रवादी हे देखील भाजपा अवलंबित आहेत. न पेक्षा सत्ताधारी पक्ष म्हणून शिंदे सेना, अजीत दादांच्या ऐवजी भाजपात जावे, असा कल असून काडादी समर्थक़ भाजपात जावे या मताचे आहेत. परंतु काडादी यांनी अधिकृत भूमिका जाहीर केली नसली तरी, त्यांच्या वर्तमानपत्रानेच बातमी प्रक़ाशित केल्यामुळे सारे चित्र स्पष्ट आहे. दरम्यान काडादी भाजपात आलेच तर दिलीप माने आणि विशेषत: दक्षिण सोलापूरमध्ये त्याचे पडसाद उमटतील अशी चर्चा आहे. त्यामुळे माने समर्थक़ सावध झाले आहेत.
What's Your Reaction?






