दक्षिण सोलापुरात शत प्रतिशतला ब्रेक, आयारामचा हात चालला
झेडपी आणि पं.स.ची एकेक जागा शिवसेनेच्या खात्यात
(विजयकुमार पिसे)
निष्ठावंतांची माती आणि आयारामला रेड कार्पेट ही नव्या भाजपायींची नीती. त्याची कुफळे योग्यवेळी समोर येतीलच. बार्शीत शत प्रतिशत भाजपाचे कमळ फुलले. तिथे राजेंद्र राऊत यांनाच सर्वाधिकार होते, दक्षिण सोलापूरमध्ये अधिकाराचे हनन झाले अशी प्राथमिक माहिती आहे. दक्षिण सोेलापूच्या निवडणुकीचा *फिल्ड रिपोर्टींग अभ्यास केला तर आयारामचा *हात चालला, ज्यामुळे जि.प. आणि पं.स.ची एकेक जागा भाजपाने गमावली, शिंदे सेनेला याचा फायदा झाला, असा निष्कर्ष काढता येईल.
दक्षिण सोलापूर काँग्रेसचा बालेकिल्ला. देवकतेे नंतर सुशीलकुमारांचेच राज्य होतेे. तिथे आम्ही संघकार्य विस्ताराच्या माध्यमातून भाजपासाठी *सुपिक जमीन तयार केली. पुढे सुभाषबापूंनी 2014 पासून हॅटट्रिक केली. गतवेळी त्यांच्या विरोधात काही आयातांनी रान उठवले. पण नागपूरकर पाठिशी असल्यामुळे अशा आयातांची मात्रा चालली नाही.
यंदाच्या मनपा निवडणुकीत बदललेले तंत्र दक्षिण सोलापूर झेडपी निवडणुकीतही दिसले. ज्यामुळे आयारामांचे चांगलेच फावले. हे तंत्र म्हणजे *समांतर निवडणूक़ यंत्रणा, एकापेक्षा अधिक उमेदवारांना एबी फॉमचे वाटप. असे तीन तीन अर्ज दाखल झाल्यामुळे पक्षाच्याच अधिकृत उमेदवारांची कोंडी झाली. वळसंग/होटगी, हत्तूर, मंद्रुप, भंडारकवठे गटात व पं.स.च्या गणात एकापेक्षा अधिक़ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यामध्ये काही काँग्रेसी आयाराम होते. नंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. हा भाग वेगळा. पण प्रचारा कुणाचा केला. हात कुणामागे लावला. ज्यामुळे हत्तूर गट आणि भंडारकवठे गणात भाजपाचा अनपेक्षित पराजय झाला.
माजी आ.रतिकांत पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील या झेडपी गटात तर प्रियांका कुबसंगे या पं.स.गणामध्ये विजयी झाल्या. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या लक्ष्मीबाई पाटील या मातोश्री. गतवेळी अमर पाटलांनी याच गटात विजय संपादन केला होता. भाजपा नेते डॉ.हविनाळे यांच्या सूनबाई उज्वला हविनाळे यांचा निसटता 34 मतांनी पराभव झाला. अमर पाटलांसाठी अनुकूल मतदारसंघ असता तर सेनेला मताधिक्क्य यापेक्षा अधिक अपेक्षित होते. हविनाळेंचा विजय दृष्टिपथात असताना कमी मतांनी त्यांना हार मानावी लागली. त्याअर्थी या मतदारसंघातील इच्छुक, ज्यांना समांतर यंत्रणेतून अर्ज भरण्याची सूचना आली. नंतर त्यांनी माघार घेतली हा भाग वेगळा. पण हातवाल्या आयारामनी *बाण चालविले, अशी चर्चा आहे.
भंडारकवठे पं.स.गणात भाजपाच्या नेहा कुपसंगे यांचा 583 मतांच्या फरकाने पराभव झाला. सेनेच्या प्रियांका कुबसंगे विजयी झाल्या. येथेही आयाराम हात चालले. इतकेच नव्हे तर रसद देखील पुरवली गेली, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे बाणाचे आयतेच फावले. असाच प्रकार अन्य मतदारसंघात झाला अशी देखील चर्चा आहे.
आयारामचे हात चालले ज्यामुळे शत प्रतिशतला ब्रेक लागला असेल तर पक्षाचे जिल्हा आणि दक्षिण तालुका अध्यक्षांकडून निवडणूक विषयक वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्रदेश भाजपाकडे जाणार का? की भविष्यात समांतर यंत्रणा चालवण्यासाठी आणि हातवाले आयाराम सेफ ठेवण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करणार? समांतर यंत्रणा चालवण्याची नव्या भाजपायींची नीती असेल तर 2029 मध्ये पक्षाला घात होईल, अशी भीती आहे. त्यामुळे 2026च्या झेडपी आणि पं.स.निवडणुकीत भाजपाच्या शतप्रतिशतला जो ब्रेक बसला. त्याची ही सुरवात म्हणता येईल. नवीन भाजपायींना काँग्रेसमुक्तची घाई लागली आहे, त्या घाईमध्ये भाजपा काँग्रेसयुक्त झाली तर? हातवाले आयाराम भाजपाचा घात करून हात दाखवतील, अशी भीती तालुक्यातील निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना आहे.
What's Your Reaction?