मतदानाआधीच भाजपाने उधळला गुलाल!
नगराध्यक्षपदासाठी मात्र सिनेस्टाईल थरार,अपेक्षेप्रमाणे विरोधकाचा उमेदवारी अर्ज बाद, अनगर परिसरात प्रचंड दहशत, उज्वला थिटे यांचा बंदोबस्तात अर्ज दाखल,पण छाननीत बाद, गत लोकसभा निवडणुकीत दगा देणारे अनगरकर आता भाजपाचे कडवट निष्ठावान कसे?
(विजयकुमार पिसे)
मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायत निवडणुकीत मतदानाआधीच सर्व 17 जागा भाजपाने बिनविरोध निवडून आणल्या आहेत. महाराष्ट्रातील हा पहिला विजय. मात्र नगराध्यक्षपदासाठी अजीतदादा गटाच्या उज्वला थिटे यांनी सिनेस्टाईल दाखल केलेला अर्ज अपेक्षेप्रमाणे छाननीत अवैध ठरला. आता अपक्ष सरस्वती शिंदे यांचा अर्ज आहे.पण माघार घेण्याच्या मुदतीपर्यंत प्रचंड दबाव आणून नगराध्यक्षपद अविरोध करण्याचा अनगरकरांचा प्रयत्न राहणार आहेच. त्यामुळे अनगरची निवडणून कोणत्या थराला जाईल, याविषयी तर्क केले जात आहेत.
अनगर नगर पंचायतीमध्ये भाजपचे 17 पैकी 17 उमेदवारांचे अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवडून आले आहेत. माजी आ. राजन पाटील समर्थकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुलाल उधळून जल्लोष केला. नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्ता पाटील (भाजप) आणि उज्वला थिटे (अजित दादा गट) यांचे व एक अपक्ष असे तीन अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थिटे यांना सिनेस्टाईल दिव्य पार पाडावे लागले. उज्ज्वला थिटे यांना शस्त्रधारी पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करावा लागला. याचा अर्थ अनगर परिसरात किती प्रचंड दहशत आहे, याचा अंदाज येईल. अर्थात बिहार आणि तेथील जंगलराजची चर्चा खूप होते. तशी स्थिती अनगरमध्ये देखील आहे का? भाजपाने यापूर्वी त्याचा अनुभव घेतला असेलच.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरुन राजकारण तापलं असून महायुतीमध्येच कडवा संघर्ष आहे. अजीतदादा गटाच्या उज्ज्वला थिटे सोमवारी पहाटेच पोहोचल्या होत्या. गत दोन दिवसांपासून निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न झाला. अनगर माजी आमदार राजन पाटील यांचे गाव. राजन पाटीलच भाजपात आल्यामुळे भाजपाला *इन्स्टंट यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपाच्या काही पदाधिक़ार्यांनी *'विकासा"चा दावा करत आपली छाती (फुकटची) फुगवली आहे. प्राजक्ता पाटील या राजन पाटलांच्या सूनबाई आहेत, त्यामुळे ही निवडणूक़ प्रतिष्ठेची करून बिनविरोधसाठी आटापिटा आहे. त्यावर टिच्चून अजीतदादा गटाने अर्ज दाखल करून पहिली लढाई जिंकली तर होती.पण छाननीत अर्ज बाद होईल, ही शक्यता होतीच. अखेर तसेच झाले. त्यामुळे अपक्ष शिंदे या माघार घेईपर्यंत पुन्हा सिनेस्टाईल थरार पाहायला मिळेल. सर्व 17 जागा अविरोध जिंकल्या, हे भाजपाचे निर्भेळ यश आहे का? याचे चिंतन भाजपाने करावे,असा सल्ला पदाधिक़ार्यांना दिला जात आहे. कारण भाजपा पार्टी विथ डिफरन्स!
What's Your Reaction?