शेतकऱ्यांच्या अनुदान, नुकसानभरपाई व पिकविमा समस्यांवर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शेतकऱ्यांच्या अनुदान, नुकसानभरपाई व पिकविमा समस्यांवर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर | शेतकऱ्यांच्या विविध समस्या, विशेषतः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अनुदानासह झालेल्या नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीबाबत आज संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात सांगण्यात आले की 2024-25 वर्षातील फळबाग लागवड योजनेचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांची फळबागे पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार आला आहे. त्यातच वाढलेल्या तांत्रिक अडचणींच्या निकषांमुळे पिक विमा देखील मिळत नसल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले.
शेतकरी आधीच कर्जबाजारी असताना या आकस्मिक संकटामुळे त्यांचे हाल अधिकच वाढले आहेत. महाराष्ट्रातील वाढते शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असताना शासनाकडूनही शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. कृषी खात्याकडून अनुदानाबाबत विचारणा केली असता “निधी उपलब्ध नाही” अशी टाळाटाळ करणारी उत्तरे मिळत असल्याचेही सांगण्यात आले.
याबाबत संभाजी ब्रिगेडने पुढील मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या :
2024–25 सालातील थकीत फळबाग लागवड योजनेचे अनुदान तातडीने वितरित करावे
अतिवृष्टीमुळे झालेल्या फळबागांच्या नुकसानीची भरपाई तत्काळ द्यावी
थकीत पिकविमा रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी
या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून मोठे जन आंदोलन छेडेल, असा इशारा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महानगर प्रमुख श्री. जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष कदम, शहराध्यक्ष मनीषा कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, उद्योग आघाडी शहराध्यक्ष संतोष सुरवसे, जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?