हा ध्वज, भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा प्रतीक
अयोध्येत पीएम मोदी हस्ते राम मंदिरावर धर्मध्वज!
अयोध्या : प्रभू श्रीरामाच्या नगरीत आज इतिहास घडला. दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर उभारण्यात आलेल्या भव्य श्री राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकावण्याचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. अयोध्येतील वातावरण भावभक्तीने भारलेले होते आणि लाखो रामभक्त या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले.
अयोध्या आज भारताच्या सांस्कृतिक चेतनेचं प्रतीक : नरेंद्र मोदी
“आजची अयोध्या ही केवळ भौगोलिक नगरी नाही, तर भारताच्या सांस्कृतिक चेतनेचं प्रतीक बनली आहे. भारतासह संपूर्ण विश्व राममय झालं आहे. शतकानुशतकांच्या तपश्चर्येला आणि संघर्षाला आता समाधान मिळत आहे.
राम मंदिराच्या बांधकामाचा प्रवास हा केवळ धार्मिक किंवा राजकीय नाही तर भारतीय समाजाच्या श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचं प्रतिनिधित्व करणारा आहे. शतकानुशतकांच्या वेदनांना आज पूर्णविराम मिळतो आहे. आज त्या यज्ञाची पूर्णाहुती झाली ज्याचा अग्नि ५०० वर्षे प्रज्ज्वलित होता.
धर्मध्वज फडकावल्यानंतर पंतप्रधानांनी त्याच्या प्रतीकात्मक अर्थावर विशेष भर दिला. आज मंदिरावर स्थापन झालेला हा धर्मध्वज केवळ भगवा कापडाचा तुकडा नाही. हा भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे, असे ते म्हणाले.
भगवा रंग, सूर्यचिन्ह आणि कोविदार वृक्ष यांच्या उपस्थितीचे अर्थ स्पष्ट करत त्यांनी सांगितले.
हा ध्वज रामराज्य तेजाचा आणि कीर्तीचा प्रतीक आहे. संघर्षापासून सृजनाकडे झालेल्या प्रवासाची गाथा म्हणजे हा धर्मध्वज होय.
*हा भगवा ध्वज म्हणजे...
मोदी पुढे म्हणाले की, हा ध्वज पुढील शतकांपर्यंत प्रभू रामाच्या आदर्शांचे आणि सत्य-धर्माच्या सिद्धांतांचे स्मरण करून देत राहील. “सत्यमेव जयतेचा हा ध्वज आहे, सत्यच ब्रह्माचं स्वरूप आहे याची घोषणा हा ध्वज करतो,” असे ते म्हणाले. तसेच “प्राण जाए पर वचन न जाई” या मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या जीवनसूत्राची प्रेरणा म्हणून हा धर्मध्वज उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिराच्या शिखरावरील ध्वजाला नमस्कार तेवढेच होते. रामलल्लाच्या जन्मभूमीच्या दर्शनाची अनुभूती देण्याचं सामर्थ्य या धर्मध्वजात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासोबतच, हा धर्मध्वज प्रभू रामाचे आदर्श, त्यांचे नैतिक मूल्ये आणि त्यांची नीति साऱ्या जगापर्यंत पोहोचवणारा आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
राम भक्तांना मोदींचा संदेश
सोहळ्याच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी देशभरातील आणि जगभरातील रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. “जगभरातील कोट्यवधी रामभक्तांचा आजचा आनंद अवर्णनीय आहे. या अविस्मरणीय क्षणाचे मी सर्वांना अभिनंदन करतो, असे म्हणाले.
ज्यांनी ज्यांनी मंदिर निर्मितीसाठी योगदान दिलं, त्या प्रत्येकाला मी हृदयपूर्वक प्रणाम करतो, असे पंतप्रधान म्हणाले.
अयोध्यात वातावरण राममय
धर्मध्वज फडकावताना अयोध्येत मंत्रोच्चार, शंखनाद, ढोल-ताशांचा नाद आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला. मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. संपूर्ण शहर फुलांच्या आरासने, भगव्या पताकांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले होते.
अनेकांच्या मते, हा क्षण राम मंदिराच्या बांधकामानंतरचा सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे
ऐतिहासिक घडामोडी अध्याय
राम मंदिर उभारणी हा आधुनिक भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण अध्यात्मिक आणि सांस्कृतिक टप्पा मानला जातो. आज फडकवलेला धर्मध्वज या प्रवासाचा नवा अध्याय सुरू करत असल्याची भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली.
या सोहळ्याने केवळ भारतीयांना नव्हे, तर जगभरातील हिंदू समाजाला एकत्र आणल्याचा अनुभव उपस्थितांनी सांगितला.
What's Your Reaction?