राजधानी दिल्लीत स्फोट; १३ठार, ३०जखमी

देशात हायअ‍ॅलर्ट, दहशतवादी हल्ल्याची शक्यता, कारमालक नदीम पोलिसांच्या ताब्यात

Nov 11, 2025 - 00:09
 0  281
राजधानी दिल्लीत स्फोट; १३ठार, ३०जखमी

(विजयकुमार पिसे)  

राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरात एका इको व्हॅनमध्ये स्फोट झाला असून 13जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. हा आकडा आणखी वाढू शकतो. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असून दिल्लीसह मुंबई आणि अन्य मोठ्या शहरांमध्ये हाय अ‍ॅलर्ट जारी केला आहे. संपूर्ण देशाला हादरवणारी ही घटना आहे. दरम्यान पोलीस तपासात आयः20 ही स्फोटातील कार असून या कारचा मालक नदीमखान यास ताब्यात घेतले आहे.

    लाल किल्लापासून केवळ ८०० मी. अंतरावर मेट्रो स्टेशनच्या बाहेर पार्किंगमध्ये सायंकाळी पावणे सात वाजता हा स्फोट झाला. स्फोट नेमका कशामुळे झालाय? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण पोलिसांनी आज फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केल्यानंतर आज संध्याकाळी दिल्लीत स्फोट झाला आहे. त्यामुळे या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे का? या दिशेने तपास केला जात आहे.

    दरम्यान फोटानंतर परिसरात मोठी आग लागली. त्यात तीन गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्या. स्फोट भीषण होता. गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. तिथे गाड्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत. काही ठिकाणी मानवी शरीराचे अवयव अस्ताव्यस्त पडल्याचे चित्र आहे. या स्फोटात आतापर्यंत 24 जण जखमी झाले आहेत. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील दुकानांची काचे फुटली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून स्फोटातील जखमींना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल केले आहे. 

स्फोट झाल्यानंतर एनआयए आणि एनएसजीची पथके या भागात दाखल झाली आहेत. रेल्वे स्थानकं, मॉल, धार्मिक स्थळांसह सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेतील प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, स्फोटाचा आवाज भीषण होता. इमारतींच्या खिडक्या उघडल्या. आणखी एक प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा तो दुकानात होता. तितक्यात स्फोट झाला. तो खुर्चीवरुन खाली पडला. असा भीषण स्फोट कधी ऐकला नाही, असे तो म्हणाला. आणखी एक जण म्हणाला, स्फोट झाला, तेव्हा गच्चीवर होतो. आकाशात आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. लोकांची पळापळ सुरु झाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow