सामान्य कार्यकर्ता होऊ शकतो राष्ट्रीय अध्यक्ष
एक महिन्यापूर्वी नितीन नबीन कोणाला होते माहीत? भाजपा अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल, उद्या औपचारिक घोषणा, माध्यमकर्मींना पुन्हा चकवा
(विजयकुमार पिसे)
भाजपा म्हणजे संघटन, या पक्षात फक्त संगठनला महत्व दिले जाते. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता असामान्य पदापर्यंत पोहोचू शकतो, हे केवळ भाजपातच घडू शकते. याचे ताजे उदाहरण म्हणजे एक महिन्यापूर्वी नितीन नबीन यांचे नाव किती जणांना माहीत होते, की जे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. आज 19 रोजी त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. 20 जानेवारीला स.11 वा. पक्षाचे अध्यक्ष म्हणून पदभार ग्रहण करतील.. 46 वर्षीय नबीन हे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नोंद होईल. *पार्टी विथ डिफरन्सचा अर्थ असा की, महाराष्ट्रातील वा देशातील बहुतांश पक्षांचे अध्यक्ष मुलगा,मुलगी,पुतणे आहेत, याच्या पलीकडे आहे कोणाचा इतिहास?
मावळते अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तसेच भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य यांच्या उपस्थितीत नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून लोकशाही निवडणूक प्रक्रियेतून निवड होेईल.
नितीन नबीन बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत. नबीन यांच्या रुपाने नव्या पिढीकडे आणि सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून पाहिले जाईल. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. 2029 च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात भाजपा निवडणूक लढवणार हे अपेक्षित आहे. गेल्या महिन्यात 15 डिसेंबरला त्यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. महिनाभरात राष्ट्रीय अध्यक्षावर अधिकृत मोहोर उमटत आहे.
शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी, काँग्रेस, द्रमुक, टीआरएस,तेलुगू देशम, राजद, स.पा. असे अनेक पक्ष आहेत, त्यांची स्थापना एका पक्षफुटीतून झाली. आणि या फुटीर पक्षांचा वारसा त्यांची पत्नी, मुले, मुली, पुतणे,भाचे किंवा रक्तातील नाते असलेले नातेवाईक पक्षाची धुरा वाहात आहेत. भाजपा हा एकमेव अपवाद आहे, जिथे *परिवारवादाला थारा नाही. पण भाजपात आता जे अनेक *आयाराम आले आहेत, ते काँग्रेसी परिवारातील आहेत, त्यामुळे कदाचित ती लागण भाजपातही होण्याची भीती आहेच. *देवाभाऊ यांनी मनपा निवडणुकीत अशी घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात तशी कृती झाली का, हा *संशोधनाचा विषय आहे. नूतन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना ही बाब दुर्लक्ष करून चालणार नाही.
What's Your Reaction?





